`या` कारणाने शहीद जवानाच्या पत्नीवर उपचार करण्यास नकार ; अखेर झाला मृत्यू
हरियाणातील सोनीपत येथे खाजगी रूग्णालयात बेफिकरीमुळे एका शहीद जवानाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे.
सोनीपत : हरियाणातील सोनीपत येथे खाजगी रूग्णालयात बेफिकरीमुळे एका शहीद जवानाच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. आधार कार्डाची ओरिजिनल कॉपी नसल्याने या महिलेला रूग्णालयात दाखल करून घेण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे उपचाराभावी त्या महिलेचा मृत्यू झाला.
काय झाले नेमके?
मृत महिलेचा मुलगा पवन कुमार याने सांगितले की, मी आईला गंभीर अवस्थेत रूग्णालायात घेऊन गेलो. तेथे माझ्याकडे आधार कार्ड मागण्यात आले. पण माझ्याकडे आधार कार्डाची ओरिजिनल कॉपी नव्हती. तेव्हा मी त्यांना फोनमध्ये आधार कार्ड दाखवले. तेव्हा त्यांनी ओरिजिनल कॉपीची मागणी केली. एका तासाच्या आत ओरिजिनल कॉपी आणण्यास सांगितले. ती दिल्याशिवाय उपचार सुरू करण्यास नकार दिला.
डॉक्टरांचा उलटा दावा
यावर रुग्णालयातील डॉक्टर म्हणतात्ये की, पवन रूग्णाला घेऊन उपचारासाठी रुग्णालयात आलाच नाही. त्यामुळे उपचारास मनाई करण्याचे काही कारणच नाही. आधार कार्ड गरजेचे आहे पण उपचारासाठी नाही तर कागदोपत्री व्यवहारासाठी.
शहीद जवानाची विधवा पत्नी
सोनीपत येथील महलाना गावात राहणाऱ्य़ा पवनचे वडील लक्ष्मण दास 1999 मध्ये कारगिल युद्धात शहीद झाले होते. गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या पवनच्या आईची शंकुतला देवी यांची तब्येत गुरूवारी अधिक गंभीर झाली. तेव्हा सेना कार्यालयात असलेल्या रूग्णालयात नेल्यावर त्यांनी जवळच्या दुसऱ्या रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. मात्र खाजगी रुग्णालयाच्या बेफिकरीमुळे उपचाराला उशिर झाली आणि त्यामुळे शकुंतला देवी यांचा मृत्यू झाला.