बंगळुरु : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांचे पद धोक्यात आहे. याबाबत बदलाचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचा मोठा गौप्यस्फोट भाजपच्या एका आमदाराने केला आहे. याबाबतचे वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. कर्नाटकात भाजपला निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करता आली नव्हती. मात्र, जनता दलने काँग्रेसच्या मदतीने सत्ता स्थापन केली. एच.डी. कुमारस्वामी हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. मात्र, काही महिन्यानंतर भाजपने विरोधकांचे आमदार फोडत  कुमारस्वामी यांचे सरकार डळमळीत केले. आणि त्यानंतर येडियुरप्पा यांचे सरकार स्थापन केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एच.डी. कुमारस्वामी यांचे आघाडीचे सरकार कर्नाटकात आल्यानंतर भाजपने त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस आणि जनता दलाचे काही आमदार गळाला लावत  मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे सरकार धोक्यात आणले. त्यानंतर मुख्यमंत्री झालेल्या बी.एस. येडियुरप्पा यांचेच पद आता धोक्यात आले आहे. पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या नाराजीमुळे येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रीपद जाण्याची शक्यता आहे. भाजपाच्याच आमदाराने हा गौप्यस्फोट केला आहे. त्यामुळे जोरदार चर्चा सुरु झाली आहे.



कर्नाटकातील लवकरच मुख्यमंत्री बदलण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी यांनीही पुढील मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील असेल असे म्हटले आहे, असा दावा भाजपचे आमदार  बसंगौडा पी. यतनाल यांनी गेला आहे. त्यामुळे भाजपमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. आमदार बसंगौडा यांनी पक्षाच्या कार्यक्रमात हा गौप्यस्फोट केल्याने कर्नाटकाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 


आमदार बसंगौडा  म्हणाले, मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यावर राज्यातील बहुसंख्य वरिष्ठ नेते नाराज आहेत. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री बदलण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पुढील मुख्यमंत्री उत्तर कर्नाटकातील असेल असे संकेत दिले आहेत. उत्तर कर्नाटकातील जनतेने १०० आमदार दिले, त्यामुळे ते मुख्यमंत्री झालेत, असे ते म्हणालेत.