बंगळुरु : कर्नाटकात चांगलाच राजकीय पेच निर्माण झाला. आज मुख्यमंत्री कुमारस्वामी यांचे भवितव्य ठरण्याची शक्यता आहे. गुरूवारच्या वादळी कामकाजानंतर राज्यपालांनी कुमारस्वामींना आज दुपारी दीड वाजेपर्यंत बहुमत सिद्ध करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे सभागृहात आज काय होणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्याचवेळी भाजप आमदारही अधिक आक्रमक झाले आहेत. त्यांनी विश्वासदर्शक ठरावावर मतदान घ्यावे अशी मागणी लावून धरली आहे. काल मतदान न झाल्याने संपूर्ण रात्र काही आमदारांनी विधानभवनात काढली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, कर्नाटकच्या विधानसभेत काल सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला जाऊन त्यावर मतदान घेण्यासाठी दिवसभर विविध घडामोडी घडत होत्या. या ठरावावर काल मतदान घेऊन निर्णय घेण्यात येईल, असे अपेक्षित होते. मात्र, संध्याकाळपर्यंत मतदान घेण्यात आले नाही. उलट विधानसभा अध्यक्षांनी सभागृहाचे आजचे कामकाज तहकूब केले. त्यामुळे कुमारस्वामी सरकारचे काय होणार हा प्रश्न पुन्हा एकदा अनुत्तरीत राहिला. आज मतदान होणार की नाही, याची उत्सुकता आहे.



तर दुसरीकडे कुमारस्वामी सरकार राज्यपालांचे आदेश धुडकावण्याची शक्यता आहे. जर कर्नाटकातील जेडीएसचे सरकार बरखास्त झाल्यास कुमारस्वामी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील, अशी शक्यता आहे. काल सरकारने विश्वासदर्शक ठरावावर मतदान न घेतल्यामुळे संतापलेल्या भाजपच्या आमदारांनी विधानसभेतंच धरणे आंदोलन केले. भाजपचे आमदार रात्रभर विधानसभेतच ठिय्या देऊन होते. 



१५ सत्ताधारी आमदारांचे राजीनामे आणि २ अपक्षांनी काढून घेतलेला पाठिंबा यांच्या पार्श्वभूमीवर कुमारस्वामी सरकार अल्पमतात आल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याने बहुमत सिद्ध करण्याचे आदेश राज्यपाल वजुभाई वाला यांनी दिले. गुरुवारी बहुमत चाचणीच्या वेळी घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर विधानसभचे अध्यक्ष रमेश कुमार यांनी सभागृहाचं कामकाज स्थगित केले.



दरम्यान, बहुमत परीक्षण करण्याआधीच सभागृहाचं कामकाज स्थगित केल्यानं भाजप आमदार नाराज झाले. भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांसह विधानसभेतच धरणे आंदोलन सुरु केले. रात्रभर हे आंदोलन सुरु राहिले. भाजपच्या आमदारांनी चक्क विधानसभेत चादरी, उशा आणून मुक्काम केला.


दरम्यान, विधानसभेचे आजचे कामकाज स्थगित करण्यात आल्याने सरकारच्या विश्वासदर्शक ठरावावर आज सकाळी ११ वाजता पुन्हा चर्चेला सुरुवात होईल. त्यावेळी सभागृहात किती आमदार हजेरी लावतात आणि विश्वासदर्शक ठरावाची प्रक्रिया पूर्ण होते की नाही हे स्पष्ट होईल.