coronavirus : `या` राज्यात प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन
कोरोना व्हायरसचे वाढते रुग्ण पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
बंगळुरु : कर्नाटकात कोरोना व्हायरसचे वाढते रुग्ण पाहता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कर्नाटक सरकारने पुढील आदेशापर्यंत 5 जुलैपासून प्रत्येक रविवारी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याशिवाय रात्री 8 ते सकाळी 5 पर्यंत कर्फ्यू असणार आहे. 29 जूनपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
कर्नाटक सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 5 जुलैपासून प्रत्येक रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना कोणत्याही कामासाठी परवानगी देण्यात येणार नाही. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील भाजीपाला बाजारात जास्त गर्दी होऊ नये म्हणून सरकारने महानगरपालिका आयुक्तांना जास्तीत जास्त घाऊक भाजीपाला बाजारपेठा बसवण्याच्या सूचना दिल्या आहेत.
कर्नाटकमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री एस. सुधाकर यांनी शनिवारी सांगितलं की, सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाच्या उपचारासाठी 10,000 बेड्सची सोय असून संक्रमितांवर उपचार करण्यासाठी बहु-मजली निवासी इमारतींचा वापर केला जाईल.
कोरोनाची सौम्य लक्षणं, सामान्य लक्षणं आणि गंभीर लक्षणं अशा प्रकारात रुग्णांची विभागणी करुन, त्यानुसार उपचारांसाठी वेगवेगळे नियम तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याचंही ते म्हणाले.
कर्नाटकात आतापर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या 11 हजार 923वर गेली आहे. तर आतापर्यंत 191 जणांचा मृत्यू झाला असून 7287 जण कोरोनामुक्त झाले आहेत.