कर्नाटक विधानसभा निवडणूक : रॅलीदरम्यान राहुल गांधींनी कार्यकर्त्यांसोबत मारला चहा भज्यांवर ताव
गुजरात निवडणुकीत काँग्रेसला थेट विजय मिळवता आला नाही. मात्र, बाजपच्या वारूला वेसण घालत विजयासमीप नक्कीच पोहोचता आले. आता ही कसर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याची काँग्रेसची रणनिती आहे.
बंगळुरू: गुजरात विधानसभा निवडणूक ही काँग्रेस आणि राहुल गांधींसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. गुजरात निवडणुकीत काँग्रेसला थेट विजय मिळवता आला नाही. मात्र, बाजपच्या वारूला वेसण घालत विजयासमीप नक्कीच पोहोचता आले. आता ही कसर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भरून काढण्याची काँग्रेसची रणनिती आहे. त्यामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आतापासूनच कामाला लागले आहेत. मात्र, या वेळी त्यांचा उत्साह आणि काम करण्याची पद्धत नेहमी पेक्षा वेगळी दिसत आहे. ज्याचा प्रत्यय नुकत्याच झालेल्या रॅलीत काँग्रेस कार्यकर्ते आणि प्रसारमाध्यमांना आला.
गरमागरम भजी, चहा आणि कार्यकर्त्यांशी गप्पा
हिंदू मंदिरांना भेटीगाठी आणि रॅलीचा धडाका उडवून देत राहुल गांधींनी सोमवारी दर्ग्यांमध्येही माथा टेकवला. संख्येने प्रचंड अशा जनसमूदयासोबत रोड शोही केला आणि व्यग्र कामकाजातून काहीसा वेळ काढत कार्यकर्त्यांसोबत खास संवादही साधला. विशेष म्हणजे राहुल गांधींनी या वेळी कार्यकर्त्यांसोबत गरमागरम चहाचा आस्वाद घेत भज्यांवरही ताव मारला. त्यांनी चहा आणि भजी खात कार्यकर्त्यांसोबत मारलेल्या गप्पा हा कार्यकर्त्यांमध्ये चागलाच चर्चेचा आणि जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे.
मंदिरांसोबत दर्ग्यांनाही दिली भेट
राहुल गांधी यांनी आपल्या निवडणूक प्रचाराची सुरूवात सोमवारी रायचूर जिल्ह्यापासून केली. राहुल पहिल्यांदा दर्ग्यात गेले. तेथे त्यांनी दर्ग्यावर चादर चढवत प्रर्थना केली. या वेळी त्यांच्यासोबत कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरमय्याही होते. यानंतर राहुल रायचूर येथील कलमला गावात पोहोचले. येथे स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करत त्यांनी एका टपरीवर चहाचा अस्वादही घेतला.
राहुल गांधींच्या हटके संपर्कामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
राहुल गांधी आपल्या गावात येऊन चहाचा आस्वाद घेत आहेत याची माहिती मिळताच अधिक संख्येने लोक घटानस्थळी पोहोचले. काही कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या या विशेष संपर्काचा व्हिडिओही काढला. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.