Karnataka BJP Bribe: बीजेपी आमदाराच्या मुलाला 40 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडलं; घरात सापडली 6.10 कोटींची कॅश
Karnataka BJP MLA Son Arrested: लोकायुक्तांनी केलेल्या छापेमारीमध्ये आधी 40 लाख रुपये रोख रक्कमेची लाच घेताना या मुलाला रंगेहात पकडण्यात आलं. त्यानंतर या व्यक्तीच्या घरी 6 कोटी रुपये कॅश सापडली.
Karnataka BJP Bribe: कर्नाटकमध्ये गुरुवारी लोकायुक्तांनी भारतीय जनता पार्टीचे (BJP) आमदार मदल वीरुपक्षप्पा (Madal Virupakshappa) यांचा सुपुत्र प्रशांत कुमार (Prashant Kumar) यांना 40 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे. तपास अधिकाऱ्यांनी प्राशांत यांच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांच्या घरात 6 कोटी रुपयांची कॅश मिळाली. यंदा कर्नाटकमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधी विरोधी पक्षांच्या हाती यामुळे एक आयता मुद्दा सापडला आहे. लोकायुक्तांच्या भ्रष्टाचारविरोधी शाखेने प्रशांत यांच्या घरातून रोख रक्कम जप्त केली आहे. गुरुवारी रात्री ही छापेमारी करण्यात आली. रात्री उशीरापर्यंत छापेमारी सुरु होती.
मैसूर सॅण्डल साबण बनवणारी कंपनी
दावणगेरे जिल्ह्यामधील चन्नागिरीचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी राज्य सरकारच्या मालकीच्या 'कर्नाटक सोप अॅण्ड डिटर्जंट लिमिटेड' (केएसडीएल) या कंपनीच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रामध्ये मदल वीरुपक्षप्पा यांनी, "माझ्या कुटुंबियांविरोधात कट रचला जात आहे.मी नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा देत आहे कारण माझ्याविरोधातही आरोप करण्यात आले आहेत," असं म्हटलं आहे. केएसडीएल ही कंपनीच जगप्रसिद्ध मैसूर सॅण्डल हा साबण बनवते. मदल विरुपक्षप्पा यांचे पुत्र बंगळुरुमधील पाणी पुरवठा आणि सीवरेज बोर्डाचे मुख्य लेखापाल आहेत. कर्नाटकमध्ये लोकायुक्त अधिकाऱ्यांनी गुरुवारी विरुपक्षप्पा यांचा मुलाला केएसडीएलच्या कार्यालयामध्ये 40 लाखांची लाच घेताना रंगेहात पकडल्यानंतर अटक केली.
घरात सापडले 6.10 कोटी रुपये
कर्नाटकमधील लोकायुक्त कार्यालयाने जारी केलेल्या पत्रानुसार 2008 च्या बॅचचे कर्नाटक प्रशासकीय सेवेचे अधिकारी प्रशांत मदल यांच्याविरोधात तक्रार प्राप्त झाली होती. यामध्ये साबण आणि डिटर्जंट बनवण्यासाठी कच्चा माल विकत घेण्याच्या व्यवहारासाठी एका ठेकेदाराकडून प्रशांत मदल हे 81 लाखांची लाज मागितल्याचं म्हटलं होतं. याच तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टीमने केएसडीएलच्या ऑफिसवर छापा टाकला. प्रशांत यांच्या कार्यालयावर छापा घातला तेव्हा ते लाच म्हणून घेतलेल्या पैशांसहीत पकडले गेले. कर्नाटकचे लोकायुक्त बी. एस. पाटील यांनी, "जेव्हा लोकायुक्त पोलिसांनी केएसडीएल कार्यालयावर छापा मारला तेव्हा त्यांना तिथे 2.2 कोटी रुपये जप्त करण्यात आले. त्यांनी प्रशांत यांच्या घरावर छापा मारला असता 6.10 कोटी रुपये जप्त केले. या प्रकरणामध्ये 5 जणांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याचा खुलास होईल," असं सांगितलं.
मुख्यमंत्र्यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी स्वत: या मुद्द्यावर भाष्य करताना लोकायुक्त कार्यालयाकडून या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होईल असं स्पष्ट केलं आहे. विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसवरही बोम्मई यांनी टीका केली आहे. "भ्रष्टाचारावर नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही पुन्हा लोकायुक्तांची स्थापना केली. काँग्रेसच्या काळामध्ये लोकायुक्त भंग झाल्याने भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं बंद झाली. आम्ही बंद झालेल्या त्या प्रकरणांचाही तपास करणार आहोत. लोकायुक्त एक स्वतंत्र संस्था आहे आणि हीच आमची स्पष्ट भूमिका आहे. संस्था स्वतंत्रपणे या प्रकरणाचा तपास करेल. सरकार यामध्ये कोणत्याही पद्धतीने ढवळाढवळ करणार नाही. भ्रष्टाचारामध्ये सहभागी असलेल्या दोषींना शिक्षा देण्याची आमची भूमिका आहे. लोकायुक्तांकडे सर्व माहिती आहे. पैसे कोणाचे होते, कुठून आले होते सर्व काही समोर यायला हवं," असं बोम्मई म्हणाले.
मी मुलाशी बोललोही नाही...
चन्नागिरीचे आमदार मदल विरुपक्षप्पा यांनी या प्रकरणाबद्दल भाष्य करताना, "मला यासंदर्भात कोणतीही माहिती नाही. याची माहिती मला मीडियामधून मिळाली. याबद्दल मी माझ्या मुलाशीही चर्चा केलेली नाही कारण तो आता लोकायुक्तांच्या ताब्यात आहे. मी कोणत्याही टेंडरमध्ये सहभागी नाही," असं सांगितलं.
काँग्रेस म्हणते भाजपाचा हाच पॅटर्न
कर्नाटक काँग्रेसने ट्वीटरवरुन मदल विरुपक्षप्पा यांच्यावर निशाणा साधला आहे. "भाजपा सरकारमध्ये लूट सुरु आहे. भाजपा आमदाराचा मुलगा 40 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला. आता त्याच्या घरातून कोट्यावधी रुपये जप्त करण्यात आला. वडील सरकारी कंपनीचे अध्यक्ष, मुलगा लाच घेतो. हीच भाजपाच्या भ्रष्टाचाराची पद्धत आहे," असं काँग्रेसने म्हटलं आहे.
दोघांचाही समावेश
लोकायुक्त पोलीस अधिकाऱ्यांनी केएसडीएलचे अध्यक्ष आणि भाजपाचे आमदार मदल वीरुपक्षप्पा यांच्या माध्यमातून ही रक्कम घेण्यात आली होती, असं सांगितलं. भ्रष्टाचाराच्या या प्रकरणामध्ये वडील आणि मुलगा दोघेही आरोपी असल्याचं लोकायुक्त पोलिसांनी म्हटलं आहे.