Boxing Competition: खेळाचा आनंद लुटण्यासाठी क्रीडाप्रेमी अनेक स्पर्धांना हजेरी लावत असतात. पण काही वेळा अशा घटना घडतात ज्या आयुष्यभराच्या वेदाना देऊन जातात. बंगळुरू इथं अशीच एक धक्कादायक आणि दु:खद घटना समोर आली आहे. किकबॉक्सिंग स्पर्धेदरम्यान झालेल्या दुखापतीमुळे 23 वर्षीय बॉक्सरचा मृत्यू झाला. बॉक्सर दोन दिवस कोमात राहिला, त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी प्रतिस्पर्धी खेळाडूविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉक्सिंग स्पर्धेदरम्यानची घटना
बंगळुरुच्या जनभारतीत पोलीस स्टेशनच्या हद्दीत 10 जुलैला एका कि बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. एका सामन्यात निखिल आणि नवीन हे दोन  बॉक्सर आमने सामने होते. अटितटीचा सामना सुरु असतानाच नवीनचा एक पंच निखिलच्या वर्मी लागला. हा पंच इतका जोरदार होता की निखिल जागेवरच कोसळला.


निखिलची कोणतीही हालचाल दिसत नव्हती. त्यामुळे पंचाने निखिलला उठवण्याचा प्रयत्न केला. निखिल निपचीत पडला होता. त्यामुळे त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तब्बल दोन दिवस निखिल कोमात होता. पण दोन दिवसांनी त्याची मृत्यूशी झुंज संपली. 


पोलिसांनी दाखल केला गुन्हा
या प्रकरणी बंगळुरू पोलिसांनी आयोजक आणि प्रतिस्पर्धी खेळाडू नवीन यांच्याविरुद्ध आयपीसीच्या कलम 304A अंतर्गत निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल केला आहे. म्हैसूरच्या या खेळाडूने अल्पावधीतच किक बॉक्सिंगमध्ये चांगले नाव कमावले होते. निखिलचे वडीलही कराटे खेळाडू आहेत.


कुटुंबाने केली चौकशीची मागणी
निखिलच्या मृत्यूनंतर त्याचे प्रशिक्षक विक्रम नागराज दु:ख व्यक्त केलं आहे तर निखिलच्या कुटुंबीयांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.