`सिद्धरामय्यांना मुख्यमंत्री करा`, आत्तापर्यंत १४ आमदारांचे राजीनामे
मुख्यमंत्री कुमारस्वामी परदेशात आहेत. ते उद्या बंगळुरूला पोहोचणार आहेत
बंगळुरू : कर्नाटकातलं काँग्रेस-जनता दल सेक्युलर आघाडी सरकार संकटात आलंय. आत्तापर्यंत काँग्रेस आणि जेडीएसच्या १४ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांच्या कार्यालयाकडे राजीनामा धाडलाय. जेडीएसचे नेते एच विश्वनाथ यांच्या म्हणण्यानुसार, आत्तापर्यंत सरकारमध्ये सहभागी असलेल्या १४ आमदारांनी राजीनामा सोपवलाय. मात्र आज अध्यक्ष त्यांच्या कार्यालयात नव्हते. उद्या सुटी असल्यामुळे आता याबाबत सोमवारीच निर्णय होण्याची शक्यता आहे. आमदारांनी अध्यक्षांच्या सचिवांकडे आपला राजीनामा सादर केलाय.
दरम्यान, राजीनामा दिलेले सर्व आमदार कप्पेगौडा विमानतळाकडे रवाना झाल्याचं समजतंय. राजभवनातून हे आमदार थेट विमानतळकडे रवाना झालेत. राजीनामे दिलेल्या सर्व आमदारांना मुंबईतील एका रिसॉर्टमध्ये आणलं जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करण्याचे आदेश देतील, त्यावेळी सरकार पडेल असं नियोजन करण्यात आलंय, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय.
राजीनामा दिल्यानंतर आमदारांनी राज्यपाल वजुभाई वाला यांची भेट घेतली असून कुमारस्वामींना बहुमत सादर करण्यास सांगावं, अशी मागणी केलीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्री कुमारस्वामी परदेशात आहेत. ते उद्या बंगळुरूला पोहोचणार आहेत. भाजपानं यावर सावध प्रतिक्रिया दिलीय. सरकार स्थापनेबाबत अंतिम निर्णय राज्यपालांचा असेल, असं डी.व्ही. सदानंद गौडा यांनी म्हटलंय.
दुसरीकडे काँग्रेस आमदारांनी नवा डाव मांडत 'राज्यात सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री बनवलं जावं' अशी मागणी केलीय. दीर्घकाळापासून काँग्रेस आणि पक्षाच्या आमदारांचं या सरकारचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनीच असायला हवं, असं म्हणणं आहे. आता हे म्हणणं त्यांनी खुलेपणानं मांडलंय.
कर्नाटक विधानसभेत १०४ आमदारांसोबत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरलाय. काँग्रेसकडे ७९ आमदार आहे. काँग्रेसनं जेडीएससोबत मिळून कर्नाटकात सत्तास्थापन केली होती. परंतु, सुरुवातीपासूनच या आघाडीचं सरकार वादात आहे.