जैन साधूचे तुकडे करुन बोअरवेलमध्ये फेकून दिले; पोलिसांसह आरोपीसुद्धा घेत होते शोध
Jain Monk Murdered : बेळगावी जिल्ह्यातील बेपत्ता जैन साधूंचा शोध शनिवारी संपला असून त्याची हत्या झाल्याचे धक्कादायक सत्य समोर आले आहे. एका गावातील शेतातील निकामी बोअरवेलमध्ये त्यांच्या शरीराचे अवयव सापडल्याचा धक्कादायक खुलासा झाला आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे.
Jain Monk Murdered : कर्नाटकातील (Karnataka Crime) बेळगाव जिल्ह्यात एका जैन साधूची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिगंबर जैन साधू आचार्य श्री कामकुमारा नंदी महाराज (Monk Kamakumar Nandi Maharaj) यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. हत्येनंतर आरोपीने त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून दिल्याचे म्हटलं जात आहे. पोलिसांनी याप्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. मुनी कमकुमार नंदी महाराज हे बुधवारपासून बेपत्ता होते. गुरुवारीच भाविकांनी बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कमकुमार नंदी यांची हत्या झाल्याचे उघड झाले आहे. पोलीस (Karnataka Police) या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
माध्यमांच्या वृत्तानुसार, आचार्य श्री कमकुमार नंदी महाराज हे बेळगावी जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील हिरेकोडी गावात असलेल्या नंदीपर्वत आश्रमात गेल्या 15 वर्षांपासून राहत होते. दरम्यान, गुरुवारी आचार्य कमकुमारनंदी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष भीमप्पा उगरे यांनी जैन साधू बेपत्ता झाल्याची पोलिसात फिर्याद दिली होती. त्यानंतर चिक्कोडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी संशयाच्या आधारे दोघांना ताब्यात घेतले होते. तपासादरम्यान जैन साधू कमकुमार नंदी महाराज यांची हत्या झाल्याचे समोर आले आहे. सध्या पोलिसांनी जैन साधू कमकुमार नंदी महाराज यांच्या मृतदेहाचा शोध सुरू केला होता.
परिस्थिती तणावपूर्ण असल्याने बेळगावचे पोलीस अधीक्षक संजीव पाटील व इतर वरिष्ठ अधिकारी काटकबावी व हिरेकोडी गावात तळ ठोकून असून तेथे अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आश्रमाच्या विश्वस्तांच्या म्हणण्यानुसार, जैन मुनी बेपत्ता झाल्यानंतर आरोपीही त्यांच्या शोधात सामील झाले होते. संशय आल्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी केली आणि त्यांनी कबुली दिली.
सुरुवातीला आरोपींनी जैन मुनींची हत्या कुठे केली आणि मृतदेह कोठे फेकला याची स्पष्ट माहिती पोलिसांना दिली नव्हती. कटकबावी गावाजवळ जैन साधूच्या मृतदेहाचे तुकडे करून फेकून देण्यात आल्याचे आरोपींनी म्हटलं होते. तसेच जैन मुनींचा मृतदेह कापडात गुंडाळून नदीत फेकल्याचे बोलले जात आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शुक्रवारी मध्यरात्रीपर्यंत कटकबावी गावात शोधमोहीम राबवली.
शनिवारी, सुमारे 10 तासांच्या तपासानंतर, पोलिसांनी जैन मुनींच्या शरीराचे अवयव जप्त केले. आरोपींनी त्यांच्या आरोपींनी तुकडे केले होते, ते एका पिशवीत ठेवले होते आणि बंद असलेल्या बोअरवेलमध्ये टाकले होते. निकामी झालेल्या बोअरवेलमधून तुकडे बाहेर काढण्यासाठी बराच वेळ लागला.
दरम्यान, , या निर्घृण हत्येचा हेतू आर्थिक वादाशी संबंधित असल्याचे म्हटलं जात आहे. कारण आरोपींनी आचार्य श्री कमकुमार नंदी महाराज यांच्याकडून पैसे घेतले होते आणि ते परत करु शकत नव्हते. दुसरीकडे पैसे परत करण्यासाठी आचार्य श्री कमकुमार नंदी महाराज त्यांच्या मागे लागले होते. जैन मुनींनी पैसे मिळवण्यासाठी दबाव वाढवल्याने आरोपींनी त्यांची हत्या केली असे प्राथमिक तपासात समोर आले आहे. मात्र, तपास पूर्ण झाल्यानंतरच नेमके कारण समजेल, असे पोलिसांनी सांगितले.