नवी दिल्ली : गेले २१ दिवस कर्नाटकात सत्ता संघर्ष पाहायला मिळाला. जेडीएसचे तीन तर काँग्रेसचे १० आमदारांनी बंडखोरी केली. त्यानंतर भाजपने विश्वासदर्शक ठरावाची मागणी केली. त्यानंतर कुमारस्वामी सरकार ९९ विरुद्ध १०५ मतांनी कोसळले. याबाबत आता काँग्रेसमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. काँग्रेस-जेडीएसचे सरकार कोसळल्यानंतर काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी वाड्रा यांनी भाजपला जोरदार टोला लगावला आहे. प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही. याचा प्रत्यय तुम्हाला एक दिवस येईल, असे त्यांनी भाजपला सुनावले.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 प्रियंका गांधी यांनी याबाबत ट्विट केले आहे. कर्नाटकमधील सत्ता संघर्ष मंगळवारी संपुष्टात आले. विश्वासदर्शक ठराव मतदानाच्यावेळी सत्ताधाऱ्यांना कमी मते पडल्याने कुमारस्वामी सरकार कोसळले. त्यामुळे भाजपला सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, यानंतर काँग्रेसकडून प्रतिक्रिया येत आहे. प्रत्येक गोष्ट विकत घेता येत नाही याची जाणीव एक दिवस भाजपाला होईल. प्रत्येकाला धमकावले जाऊ शकत नाही. प्रत्येक खोटे एकदिवस उघडे पडते, अशा शब्दात प्रियंका गांधी यांनी आपले मत व्यक्त केले आहे.


काँग्रेस-जेडीएस सत्ताधारी आघाडीतील बंडखोर आमदारांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर कुमारस्वामी सरकार पडणार असे सांगितले जात होते. मात्र, आमचे सरकार स्थिर आहे, असा दावा सत्ताधाऱ्यांकडून करण्यात येत होता. बंडखोर आमदारांना समजविण्याचा प्रयत्न सुरु होता. मात्र, महाराष्ट्रात मुंबईमध्ये ठाण मांडून बसलेल्या आमदारांपर्यंत काँग्रेस-जेडीएस नेत्यांना यश येत नव्हते. कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यासाठी भाजपने काळजी घेतल्याचा आरोपही करण्यात येत आहे. सरकार वाचविण्यासाठी आघाडीने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुंबईत तळ ठोकलेल्या १३ बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्नही सत्ताधाऱ्यांनी केला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले.  तसेच राज्यपाल वजुभाई वाला यांनी ठरावावरील मतदानासाठी मुदत दिली होती. मात्र, त्याचाही उपयोग झाला नाही.