Karnataka Election 2023: एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री; काँग्रेसचा सत्तेचा नवा फॉर्म्यूला? सर्व समाजातील मतदारांना खूश करणार
Karnataka Election 2023: कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळालं असून आता सरकार स्थापनेची तयारी सुरु झाली आहे. काँग्रेस सिद्धरमय्या (Siddaramaiah) यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकण्याची शक्यता आहे. दरम्यान राज्याला तीन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
Karnataka Election 2023: कर्नाटकात काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे. अंतिम आकडेवारी अद्याप अधिकृतपणे जाहीर झाली नसली तर काँग्रेसने बहुमताचा आकडा गाठल्याचं स्पष्ट आहे. काँग्रेसने राज्यात जोरदार प्रचार करणाऱ्या भाजपाचा दणदणीत पराभव केला आहे. यासह भाजपाचं राज्यात पुन्हा सत्तेत येण्याचं स्वप्न भंगलं असून, दक्षिणेतील एकमेव राज्यंही गमावलं आहे. दरम्यान, यानंतर काँग्रेसकडून आता राज्यात सरकार स्थापन करण्याची तयारी सुरु झाली आहे.
कर्नाटकात काँग्रेसचं सरकार आल्यानंतर आता अनेक प्रश्न विचारले जात आहेत. कर्नाटकचा पुढील मुख्यमंत्री कोण असणार? याचीही चांगलीच चर्चा रंगली आहे. यादरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार, सिद्धरमय्या यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडण्याची शक्यता आहे. तसंच पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांना राज्य मंत्रिमंडळात मोठी जबाबदारी दिली जाऊ शकते. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, राज्याला तीन उपमुख्यमंत्री मिळण्याची शक्यता आहे.
कर्नाटकात काँग्रेस एक मुख्यमंत्री आणि तीन उपमुख्यमंत्री असण्याची शक्यता आहे. तीन उपमुख्यमंत्री लिंगायत, वोक्कालिगा आणि एक दलित समाजातील असतील अशी माहिती आहे. या तीन समाजातील उपमुख्यमंत्री नेमण्याचं कारण म्हणजे, या तिन्ही समाजातून काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मतदान झालं आहे. दरम्यान, यामधील एक जण मुस्लीम समाजातील असू शकतो अशीही चर्चा आहे. मात्र अद्याप त्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही.
गेल्या काही निवडणुकांमध्ये सलग झालेल्या पराभवानंतर काँग्रेसला कर्नाटकच्या निमित्ताने यशाची चव चाखायला मिळाली आहे. काँग्रेसने 1989 नंतर पहिल्यांदाच राज्यात इतक्या जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे पक्षांतर्गत वाद निर्माण करत मिळालेला विजय हातातून निसटू नये अशी काँग्रेसची इच्छा आहे. याच पार्श्वभूमीवर सिद्धरमय्या आणि डी के शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपद कोणी घ्यावं यावरुन संघर्ष टाळला असून पक्षप्रमुख जो निर्णय देतील तो मान्य असेल असं स्पष्ट केलं आहे. सिद्धरमय्या ज्येष्ठ नेते असून त्यांना मुख्यमंत्री केलं जावं अशी अनेकांची मागणी आहे. दरम्यान, त्यांनी आपली ही शेवटची निवडणूक असेल हे आधीच जाहीर केलं होतं.
निवडणुकीतील विजयानंतर काँग्रेसने सर्व आमदारांना विधीमंडळ पक्षाच्या महत्त्वाच्या बैठकीला बोलावलं आहे. बंगळुरुमधील Shangri La Hotel मध्ये ही बैठक पडणार आहे. याच बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल आणि त्यानंतर शपथविधी सोहळा पार पडेल अशी सूत्रांची माहिती आहे.
राहुल गांधी विजयावर काय म्हणाले?
कर्नाटकमधल्या विजयानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी राज्याचील जनतेचे, नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले. कर्नाटकच्या निवडणुकीत एकीकडे भांडवलदारांची ताकद होती, तर दुसरीकडे गरीब जनतेची शक्ती होती. शक्तीने ताकदीचा पराभव केला. हेच चित्र देशात दिसेल असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. आम्ही गरीबांच्या प्रश्नावर निवडणूक लढवली. आम्ही प्रेमाने ही लढाई जिंकलो. कर्नाटकात द्वेषाचा बाजार बंद झाला आहे, आणि प्रेमाची दुकानं सुरु झाली आहे. हा विजय कर्नाटकच्या जनतेचा विजय आहे असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. तर आम्ही कर्नाटकच्या निडणुकीत जनतेला पाच आश्वासनं दिली होती, ती पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत पूर्ण करु असंही ते म्हणाले आहेत.