Karnataka Election: PM मोदींचा मेगा रोड शो, अन् दुसरीकडे राहुल गांधींचा डिलिव्हरी बॉयच्या स्कुटवरुन प्रवास, VIDEO व्हायरल
Karnataka Election 2023: काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Rahul Gandhi) कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) प्रचारानिमित्त सध्या बंगळुरुत (Bengaluru) आहेत. यावेळी त्यांनी डिलिव्हरी बॉयच्या स्कुटवरुन जवळपास 2 किमी प्रवास केला.
Karnataka Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या (Karnataka Assembly Election) निमित्ताने सध्या अनेक नेते प्रचारात उतरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा रविवारी बंगळुरुत मेगा रोड शो पार पडला आहे. नरेंद्र मोदींना पाहण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. फुलांनी सजवलेल्या गाडीमधून नरेंद्र मोदी सर्व लोकांना अभिवादन करत होते. तर दुसरीकडे, काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी हॉटेल गाठण्यासाठी डिलिव्हरी बॉयच्या स्कूटरवरुन प्रवास केला.
राहुल गांधी कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सध्या प्रचारात व्यग्र आहेत. 10 मे रोजी राजधानीत त्यांच्या सभा पार पडणार आहेत. मात्र त्याआधी त्यांनी एका डिलिव्हरी बॉयच्या स्कूटरवरुन प्रवास केला. जवळपास 2 किमी त्यांनी हा प्रवास केला.
विधानसभा निवडणुकीसाठी फक्त चार दिवस शिल्लक असून सर्व राजकीय पक्ष शेवटच्या टप्प्यात जोरात प्रचार करत आहेत. मतदारांना आकर्षित करण्यासाठी पक्षांकडून सर्व प्रकारचे हतगंडे अवलंबले जात आहेत. यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी शहरात मेगा रोडशो पार पडला. मोदींची एक झलक पाहण्यासाठी लोकांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. पंतप्रधानांनी न्यू टिपसंद्र रोड येथील केम्पेगौडा पुतळ्यापासून रोड शोला सुरुवात केली आणि ट्रिनिटी सर्कल येथे त्याची सांगता झाली.
कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून, सलग दुसऱ्या दिवशी भाजपा मेगा रोड शो पार पडला आहे. 10 किमीच्या या मेगा रोड शोमुळे भाजपाला फायदा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. मोदींची रॅली पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीत अनेकजण वाद्य वाजवत होते. यामध्ये ड्रमदेखील होते.
याआधी शनिवारी नरेंद्र मोदींचा 26 किमीचा मेगा रोड शो पार पडला. या रोड शोमध्ये 13 मतदारसंघांना भेट देण्यात आली. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा रविवारी बेळगाव दक्षिण मतदारसंघात रोड शो पार पडला. अमित शाह यांच्या वाहनाला भाजपा कार्यकर्त्यांनी घेरलं होतं. त्यांच्या सुरक्षेत हा रोड शो पुढे सरकत होता. यादरम्यान अमित शाह रस्त्यावर गर्दी केलेल्या लोकांना हात दाखवत अभिवादन करत होते.
कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून, 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीला अवघे तीन दिवस शिल्लक असल्याने सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार केला जात आहे. राज्यभरात सभा, बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे.