प्रताप नाईक, झी मीडिया, शिमोगा : कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं जोर पकडलाय. भाजपच्या प्रचाराची धुरा मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार येडियुरप्पांकडे सोपवण्यात आलीय. मात्र, पक्षांतर्गत कलह आणि येडियुरप्पांचा आधीचा केजीपी पक्ष कायम असल्यामुळे भाजपची मोठी डोकेदुखी वाढलीय. एकूणच या पार्श्वभूमीवर शिमोगा या येडियुरप्पांच्या जिल्ह्यात जाऊन तिथल्या राजकीय परिस्थितीचा घेतलेला वेध...


अंतर्गत संघर्ष 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपा मुख्यमंत्री पदाचे उमेदवार येडीयुराप्पा हे जुना म्हैसूर प्रांतातील शिमोगा जिल्ह्याचं नेतृत्व करतात. याच जिल्ह्यामध्ये येडीयुराप्पा आणि भाजप नेते इश्वराप्पा यांच्यामध्ये राजकीय अंतर्गत संघर्ष आहे. दोघेही आर. एस. एसचे कट्टर कार्यकर्ते पण पक्षातील तुझं स्थान मोठं की माझं स्थान यावरुन यांच्यामध्ये मतभेद आहेत. येडीयुराप्पा यांनी २०१३ च्या निवडणुकी दरम्यान भाजपाशी फारकत घेऊन कर्नाटक जनता पार्टी स्थापन केली होती. त्यावेळी इश्वराप्पा यांच डिपॉझिटदेखील जप्त झालं होतं. शिमोगा विधानसभा मतदार संघावर इश्वराप्पा यांची गेल्या अनेक वर्षांपासून मजबूत पकड आहे. तरीदेखील त्यांना पराभव पत्करावा लागल्याचं शल्य त्यांच्या मनात आहे... इतकंच नव्हे तर येडीयुराप्पा यांच्यासोबत के.जे.पीमधून भाजपा पक्षात परत आलेल्या कार्यकर्त्यांच्याबाबातही त्यांना चांगलाच राग आहे. पण, त्याबाबत ते उघडपणे बोलत नाहीत. पण, पक्ष मात्र असा कोणताही संघर्ष दोघांमध्ये नसल्याचं सांगत आहे.


भाजपमधील छुपा संघर्ष 


कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना काऊंटर करण्यासाठी इश्वराप्पा यांनी संगोळी रायन्ना या नावाने संघटना स्थापन केली होती. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी उपार, कुरबा, देवांग, ३६ क्षत्रीय, जातीच्या लोकांना एकत्र करुन आपली ताकद वाढवत होते. त्या संघटनेच मोठ ब्रॅन्डींगही कर्नाटकात करण्यात आलं. त्यामुळं गावा गावात अनेक ठिकाणी संगोळी रायन्ना संघटनेची ताकद आहे. पण भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांनी संगोळी रायन्ना संघटनेमुळं  आपल्या विचारधारेला नुकसान पोहचेल म्हणून ही  संघटना बंद करायला भाग पाडलं. एकीकडं भाजपामधील या दोघा नेत्यातील छुपा संघर्ष असताना दुसरीकडं कर्नाटक मधील अनेक जिल्ह्यात भाजपा वर्सेस के.जे.पी कार्यकर्ते असा तीव्र संघर्ष पहायला मिळत आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा कर्नाटकमधील तुमकूर इथल्या सिद्धगंगा मठाच्या दौऱ्यावर असताना भाजपाच्या मूळ कार्यकर्त्यांना पासेस देण्यात आले नव्हते, त्यामुळं भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तिथच घोषणाबाजी सुरु केली. त्यावरुनच भाजप अंतर्गत कसा वाद आहे हे दिसून येतं.


दुरावा कसा संपणार?


येडीयुराप्पा यांनी पक्षात आपलं स्थान बळकट व्हावं, यासाठी आपल्यासोबत के.जे.पी मध्ये आलेल्या कार्यकर्त्यांना पद दिलेली आहेत. त्यामुळं मूळ भाजप कार्यकर्त्यांमध्ये अनेक जिल्ह्यात नाराजी आहे. पक्षांची उमेदवारी कोणाला यावरुनदेखील पक्षामध्ये काही जिल्ह्यात दोन गट पडलेले आहेत. त्यामुळं भाजपा नेते या दोन गटातील दुरावा कसा संपवणार हा महत्त्वाचा विषय आहे. एकीकडं पक्षांतर्गत कुरघोडी तर दुसरीकडं काँग्रेस पक्ष येडीयुराप्पा यांच्यावर तुटून पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भ्रष्टाचाराविरुद्ध बोलत असताना त्याच्याच शेजारी हा भ्रष्टाचारी नेता कसा? असा प्रश्न उपस्थित करत आहेत.


काँग्रेसनं लिंगायत समुदयामध्ये पाडलेली फूट भाजापाच्या नेत्यामध्ये असणारा अंतर्गत वाद आणि मूळ भाजप कार्यकर्ते विरुद्ध के.जी.पी कार्यकर्ते असा असणारा संघर्ष यातून पक्षांचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह कसा मार्ग काढणार यावरच कर्नाटकमधील भाजपाचं यश अवलंबून आहे.