Karnataka Elections : तेजस्वी सूर्या स्वतःच्याच राज्यात प्रचारापासून वंचित? भाजपच्या स्टार प्रचारकांच्या यादीत नाव नाही
Karnataka Elections : भाजपसह काँग्रेसने आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून बड्या नेत्यांना वगळण्यात आले आहे. भाजपचे फायरब्रँड युवा नेते तेजस्वी सूर्या यांच्यासह काँग्रेसचे सचिन पायलट आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनाही संधी देण्यात आलेली नाही
Karnataka Elections : कर्नाटकात सध्या विधानसभा निवडणुकीची (Karnataka Elections 2023) रणधुमाळी उडाली आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी भाजप (BJP) आणि काँग्रेसने (Congress) जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. यासोबतच दोघांनीही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तसेच भाजप आणि काँग्रेसने आपापल्या स्टार प्रचारकांची (star campaigners) यादीही जाहीर केली आहे. मात्र याच यादीमुळे आता कर्नाटकासह देशातील राजकारणही तापलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हे कर्नाटकच्या निवडणुकीसाठी स्टार प्रचारकांच्या यादीत आहेत. मात्र कट्टर हिंदू अशी प्रतिमा असलेले फायरब्रँड युवा नेते आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि बंगळुरू दक्षिणचे लोकसभा खासदार तेजस्वी सूर्या (Tejasvi Surya) यांनी या यादीमध्ये स्थान देण्यात आलेलं नाही.
दुसरीकडे काँग्रेसनेही आपल्या स्टार प्रचारकांच्या यादीतून महत्त्वाच्या नेत्यांना हटवलं आहे. भाजपने तेजस्वी सूर्या यांचे नाव हटवले आहे. तर काँग्रेसने राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांचा प्रचारकांच्या यादीत समावेश केलेला नाही. त्यामुळे आक्रमकपणे आपल्या पक्षाची भूमिका मांडणाऱ्या या नेत्यांना स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान का देण्यात आलेलं नाही अशी चर्चा सध्या सुरु झाली आहे.
भाजप युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या हे नाव सातत्याने चर्चेत असते. तरुणांमध्ये तेजस्वी सूर्या हे खूप लोकप्रिय आहेत. हिंदुत्वाची विचारधारा घेऊन कायमच आक्रमक भूमिका घेणाऱ्या तेजस्वी सूर्या यांचा गुजरात निवडणुकीच्या प्रचारातही समावेश करण्यात होता. मात्र त्यांच्याच राज्यात होणाऱ्या निवडणुकांसाठी तेजस्वी सूर्या यांना प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आले आहे. त्यामुळे याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येत आहेत.
गेल्या वर्षी ऑस्ट्रेलिया इंडिया युथ डायलॉग कार्यक्रमादरम्यान तेजस्वी सूर्या यांनी एक वक्तव्य केले होते. "इस्लामचा इतिहास रक्तपात आणि हिंसाचाराने भरलेला आहे. भारतावर मुघलांचे आक्रमण ज्यूंवर केलेल्या अत्याचारासारखे होते," असे तेजस्वी सूर्या म्हणाले होते. "ख्रिश्चन आणि इस्लाम हे धर्मच नाहीत. ते राजकीय साम्राज्यवादी विचारसरणी करणारे आहेत. हिंदूंनी आपले शत्रू कोण हे समजून घेणे महत्त्वाचे आहे," असेही तेजस्वी सूर्या यांनी 2021 मध्ये उडुपी कृष्णा मठात म्हटले होते.
भाजपने दिलं स्पष्टीकरण
याच विधानांचा आपल्याला निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे तेजस्वी सूर्या यांच्या बाबतीत भाजपला कोणताही चुकीचे पाऊल उचलायचे नाही, असेच मानायला हवे. भाजपच्या म्हणण्यानुसार, तेजस्वी सूर्या यांना प्रचार करण्यापासून रोखण्यात आलेले नाही. भाजपच्या एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर द क्विंटला सांगितले की, "पक्षाने प्रचारकांची यादी तयार केली आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवली. त्यांनी या यादीला मान्यता दिली. त्याबद्दल अधिक काही सांगता येणार नाही. काळजी करण्याची गरज नाही. मात्र प्रचारकांच्या यादीत सूर्या यांना स्थान का मिळू शकले नाही, हे या नेत्याने सांगितले नाही.
"तेजस्वी सूर्या हे कर्नाटकचे खासदार आहेत आणि आमच्यासाठी लोकप्रिय नेते आहेत. किती तरी आठवड्यांपासून ते पक्षाचा प्रचार करत आहेत. पण आम्हाला संघटनेतील लोकांचीही गरज आहे. प्रत्येक वेळी प्रत्येकावर प्रचाराच्या जबाबदारीचे ओझे टाकले जाऊ शकत नाही," असेही या भाजप नेत्याने स्पष्ट केले आहे.