Karnataka Elections 2023: कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Elections) जिंकण्यासाठी सध्या भाजपा (BJP) आणि काँग्रेसकडून (Congress) जोरदार प्रयत्न सुरु आहेत. दोन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते कर्नाटकात ठाण मांडून बसले असून, एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. दरम्यान, दुसरीकडे निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणूक आयोगाने घरातून मतदान (Vote From Home)करण्याची परवानगी दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाने 'वोट फ्रॉम होम'साठी परवानगी दिली असून तशी घोषणा केली आहे. पण ही सोय फक्त दिव्यांग आणि 80 पेक्षा जास्त वय असणाऱ्यांसाठीच दिली आहे. यासह निवडणूक आयोगाने बॅलेट पेपरने मतदान करण्याची घोषणा केली आहे. निवडणूक आयोग आणि मतदान अधिकाऱ्यांची एक टीम संबंधित मतदारांच्या घरी जाईल आणि त्यांचं मत नोंदवून घेईल. 29 एप्रिल ते 6 मे दरम्यान ही प्रक्रिया पार पडणार आहे. 


निवडणूक आयोगाने 80 वर्षांहून अधिक वय असणारे ज्य़ेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना घऱातून मतदान करण्याची परवानगी दिली आहे. घरातून गुप्तपणे मतदान करण्यासाठी त्यांना मतपत्रिका दिली जाईल. मतदान प्रक्रिया पार पडत असताना एक मतदान अधिकारी, एक मायक्रो ऑब्जर्वर, व्हिडीओग्राफर आणि पार्टी एजंटसह स्थानिक पोलीस उपस्थित राहतील. 


बॅलेट मतदान प्रक्रिया तैनात कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली होईल. तसंच मतदान संपल्यानंतर हे बॅलेट बॉक्स स्ट्राँग रुममध्ये पाठवले जातील. यानंतर 13 मे रोजी या मतांची मोजणी केली जाईल. 


निवडणूक आयोग सर्व राजकीय प्रतिनधींना अनुपस्थित मतदारांची माहिती देणार आहे. याअंतर्गत पात्र मतदारांना मतदानाची माहिती दिली जाईल. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार, या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडीओ रेकॉर्डिंग केलं जाईल. मतदान केल्यानंतर सर्व मतपेट्या मतमोजणी केंद्रातील सुरक्षेत ठेवल्या जातील. 13 मे रोजी मतदानाच्या दिवशीच या मतपेट्या उघडल्या जातील. 


मतदान प्रक्रिया सुरु असताना दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या एका टीमला प्रत्येक घरात जाण्याची परवानगी असेल. निवडणूक आयोगाची टीम ज्य़ेष्ठ नागरिकांच्या घरी जाईल. जर एखादा मतदार घरी नसेल तर अशा स्थितीत निवडणूक आय़ोगाची टीम पुन्हा एकदा त्या घरी जाईल. पण जर दुसऱ्या वेळीही संबंधित व्यक्ती घरात नसेल तर त्याला मतदानाची परवानगी दिली जाणार नाही. या मतदारांना मतदार केंद्रावर येण्याची परवानगीही नसेल. 


कर्नाटकात 5 लाख 71 हजार दिव्यांग आणि 80 वर्षांहून अधिक 12 लाख 15 हजार मतदार आहेत. कर्नाटक निवडणूक आयोगाचे आयुक्त कुमार मीणा यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 99 हजार 529 लोकांना 'वोट फ्रॉम होम'चा पर्याय उपलब्ध होणार आहे. यामध्ये 80 वर्षांहून अधिक 80 हजार 250 ज्येष्ठ नागरिक आणि 19 हजार 729 दिव्यांग मतदार सहभागी आहेत.