Karnataka Elections 2023  : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट सज्ज झाला आहे. दरम्यान, शिवसेनेत एकनाथ शिंदे यांनी मोठे बंड केल्यानंतर सेनेत उभी फूट पडली. पक्षाचे नाव आणि चिन्हे शिंदे गटाकडे गेले आहे. त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या नावाखाली ठाकरे गट कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पक्षाकडून काही मोजक्याच जाग लढविण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिंदे यांच्या बंडानंतर सेनेत फूट पडली आणि राज्यातील महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गट आणि भाजप यांचे महाराष्ट्रात सरकार स्थापन झाले आहे. तर दुसरीकडे राज्यातील सत्तासंघर्षाचा तिढा सर्वोच्च न्यायालयात गेला. न्यायालयात सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे. आता न्यायालयाचा निर्णय काही दिवसात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निकालाची मोठी उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील पुणे कसबा पेठ पोटनिवडणुकीत भाजप-शिंदे गटाविरोधात महाविकास आघाडीला मोठा विजय मिळला. त्यानंतर आता ठाकरे गट कर्नाटक विधानसभा निवडणुकीत रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. थेट भाजपसमोर आव्हान उभे करण्यासाठी ठाकरे गट कर्नाटक विधानसभेच्या रिंगणात उतरत आहे. बेळगाव जिल्ह्यातील 5 विधानसभा जागा लढवणार आहे. या ठिकाणी मराठी भाषिकांची लोकसंख्या जास्त आहे. तसेच बेळगाव पालिकेत मराठी भाषिकांची सत्ता राहिली आहे. त्यामुळे आता ठाकरे गट ही निवडणूक लढवत असल्याने किती यश मिळवतो याकडे लक्ष आहे.


याधी शिवसेना आणि भाजपची युती होती. त्यावेळी भाजपविरोधात सेनेचे उमेदवार उभे करण्यात आले नव्हते. आता शिवसेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी सज्ज झाला आहे. बेळगाव या सीमावर्ती भागात महाराष्ट्र एकीकरण समितीचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे याआधी ठाकरे गटाकडून पाठिंबा देणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी जाहीर केले होते. मात्र, सेनेत फूट पडल्यानंतर ठाकरे गट ही निवडणूक लढवणार असल्याने याची मोठी उत्सुकता आहे.  


कर्नाटक सरकारकडून बेळगाव आणि इतर सीमावर्ती भागातील नागरिकांवर अन्याय होतो, तेव्हा त्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या सर्वच भागांत दिसून आला आहे. काश्मीर, सतलज आणि बेळगावचा प्रश्न लोकशाही पद्धतीनं सोडविला जात नसेल तर तो आम्ही 'ठोकशाही'नं सोडवू, असेही संजय राऊत यांनी याआधी म्हटले होते. तसेच सीमावर्ती भागातील लोकांना ठाकरे गटाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे येथील लोक ठाकरे गटाच्या पाठिशी राहतील, अशी शक्यता लक्षात घेऊन ठाकरे गटाने निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.