कुमारस्वामी होणार कर्नाटकचे नवे CM, सोमवारी घेणार शपथ
येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजुभाई वालांची भेट घेतली असून कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
बंगळुरु : येडियुरप्पांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता काँग्रेस-जेडीएसने सरकार स्थापनेचा दावा केला आहे. कुमारस्वामी यांनी राज्यपाल वजुभाई वालांची भेट घेतली असून कर्नाटकात सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
राज्यपालांची भेट घेत सत्तस्थापनेचा दावा केल्यावर राज्यपाल वजुभाई वाला यांनी सरकार स्थापनेचं निमंत्रण कुमारस्वामींना देण्यात आलं आहे.
या तारखेला होणार शपथविधी सोहळा
मिळालेल्या माहितीनुसार, कुमारस्वामी कर्नाटकचे मुख्यमंत्री बनतील. सोमवारी म्हणजेच २१ मे रोजी कुमारस्वामी आपल्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील.
येडियुरप्पांचा राजीनामा
गेले तीन दिवस रंगलेल्या राजकीय नाट्यानंतर अखेर कर्नाटकमध्ये बहुमत सिद्ध करण्यात भाजपाला अपयश आलंय. विश्वासदर्शक ठराव मंजूर होणार नसल्याचं स्पष्ट झाल्यानंतर बी.एस. येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिलाय.
ऊणेचारच्या सुमारास येडियुरप्पा विधानसभेत भाषणासाठी उभे राहिले. अत्यंत भावनिक झालेल्या या भाषणात त्यांनी सर्वात मोठा पक्ष असूनही सरकार स्थापन करण्यात अपयश येत असल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आपल्याला कर्नाटकच्या
जनतेसाठी काय-काय करायचं होतं, याचा पाठाच त्यांनी वाचला. आगामी काळात राज्यभर फिरू आणि येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला सर्व २८ जागी निवडून आणू अशी गर्जनाही त्यांनी केली. त्यानंतर आपण राजीनामा देण्यासाठी राजभवनावर जात असल्याचं येडियुरप्पांनी जाहीर केलं आणि ते विधानसभेतून निघून गेले.