बंगळुरू : कर्नाटकेच मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामींचं पुन्हा एक वादग्रस्त वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आलंय. कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील येरमरूस थर्मल पावर स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या ताफ्याचा रस्ता अडवून धरला होता. यावर मुख्यमंत्री कुमारस्वामी चांगलेच भडकले. 'तुम्ही मतं नरेंद्र मोदींना दिली आणि माझ्याकडून करून हवे आहेत. आणि तुम्हाला वाटतं की तुमच्या मागण्यांचा आदर करावा. लाठीचार्ज करायचे आदेश देऊ का? इथून चालते व्हा' अशा उद्दाम शब्दांत कुमारस्वामींनी कर्मचाऱ्यांना निघून जाण्याचे आदेश दिले. त्यानंतर मुख्यमंत्री तिथून रवाना झाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुख्यमंत्री कुमारस्वामी आपल्या 'ग्राम वास्तव्य' कार्यक्रमासाठी रायचूरमध्ये दाखल झाले होते. या घटनेबद्दल एका चॅनलशी बोलतानाही कुमारस्वामी यांनी आपल्या वर्तणुकीचं समर्थन केलं. 


आपण कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर विचार करण्यासाठी १५ दिवसांची वेळ मागितली होती. परंतु, त्यांनी रस्ता अडवून धरला आणि त्यामुळे आपल्याला राग अनावर झाला... असा जर पंतप्रधानांचा रस्ता अडवून धरला तर त्याला कुणी स्वीकार करेल का?, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.  


आमचं सरकार सहिष्णु आहे परंतु, असक्षम नक्कीच नाही. कोणत्या परिस्थितीला कसं हाताळायचं हे आपल्या सरकारला चांगलंच जमतं, अशी पुश्तीही त्यांनी जोडली. 


दुसरीकडे कर्नाटक भाजपानं मुख्यमंत्र्यांच्या या वर्तणुकीवर टीका केलीय. कुमारस्वामी राज्यातील ६.५ करोड लोकांचे मुख्यमंत्री आहेत केवळ जेडीएसच्या काही कार्यकर्त्यांचे आणि आमदारांचे नेते नाहीत हे ते विसरले असल्याची टीका भाजपानं केलीय. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील लोकांची माफी नाही मागितली तर राज्यव्यापी आंदोलन करण्याचाही इशारा त्यांनी दिलाय.