१८ राज्यांतून आईला स्कूटरवर तीर्थयात्रा घडवणारा कलियुगातील श्रावणबाळ
आईच्या एका इच्छेखातर त्यांनी उचललं हे पाऊल...
मुंबई : पौराणिक कथांमध्ये श्रावणबाळाची कथा साऱ्यांनीच ऐकली असेल. पण कलियुगातील श्रावणबाळ नेमका दिसतो कसा याची कल्पना आहे का? सध्या कर्नाटकमधी म्हैसूर शहरात एका व्यक्तीचा उल्लेख कलियुगातील श्रावणबाळ म्हणून केला जात आहे.
दक्षिणमूर्ती कृष्णकुमार यांनी आईला १८ राज्यातील देवस्थानांची यात्रा घडवली आहे. स्कुटरवर आईला घेऊन तीर्थयात्रा पूर्ण करणाऱ्या कृष्णकुमार यांच्या याच कृतीमुळे त्यांना कलियुगातील श्रावणबाळ म्हणून संबोधलं जात आहे.
कर्नाटकातील म्हैसूरमधील कृष्णकुमार हे चांगल्या नोकरीला होते. त्यांच्या वृद्ध आईला तीर्थयात्रा करण्याची इच्छा होती. घराजवळील एक मंदिर न पाहिल्याचं म्हणणाऱ्या आईला फक्त हेच मंदिर नव्हे, तर विविध ठिकाणांची सफर घडवत एका अविस्मरणीय तीर्थयात्रेवर नेण्याचा निर्धार त्यांनी केला. केवळ आईच्या इच्छेखातर त्यांनी घरातील २० वर्षे जुनी स्कुटर घराबाहेर काढली. १६ जानेवारी २०१८ला त्यांनी आईसोबत या संस्मरणीय प्रवासाची सुरुवात केली.
सारं गरजेचं सामान स्कुटरवर ठेऊन या श्रावणबाळानं एक- दोन नव्हे, तर तब्बल १८ राज्यातील तीर्थक्षेत्रांची यात्रा पूर्ण केली. ७० वर्षांच्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी कृष्णकुमार यांनी घरदारही मागे टाकलं.
वयोवृद्ध आईवडील मुलांना अडगळ वाटू लागले असतानाच अशा काळात फक्त आईच्या एका इच्छेखातर कृष्णकुमार यांनी त्यांना स्कूटरवरुन तीर्थयात्रा घडवली. त्यांच्या याच निर्णयाने आणि आईप्रती असणाऱ्या प्रेमाने उद्योगपती आनंद महिंद्रासुद्धा भारावलेय. त्यांनी कृष्णकुमार यांना नवी कोरी कार देण्याची घोषणाही केली. सध्याच्या घडीला आधुनिक काळातील हा स्कुटरवाला श्रावणबाळ त्याच्या याच कृतीमुळे प्रशंसेस पात्र ठरत आहे.