कर्नाटक सत्ता संघर्ष : राजीनामा दिलेल्या एका आमदाराचे बंड मागे
काँग्रेससाठी संकट मोचक म्हणून ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना अखेर यश आले आहे.
बंगळुरु : काँग्रेससाठी संकट मोचक म्हणून ओळख असलेले डी. के. शिवकुमार यांना अखेर यश आले आहे. बंडखोरी करत राजीनामा दिलेल्या आमदारांना भेटण्यासाठी मुंबईत शिवकुमार यांनी धाव घेतली होती. मात्र, पोलिसांनी त्यांना रोखत हॉटेलमध्ये प्रवेश करण्यास मज्जाव केला होता. त्यानंतर त्यांना विमानाने बंगळुरुला पाठविण्यात आले होते. मात्र, शिवकुमार यांनी या बंडखोर आमदाराचे मन वळविण्यात यश मिळवले आहे. शिवकुमार यांनी बांधकाम मंत्री एम. टी. बी नागराज यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. त्यामुळे एका बंडखोर आमदाराचे बंड मागे घेतल्याचे शिवकुमार यांनी सांगितले
कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएस मैत्री सरकार वाचविण्यासाठी काँग्रेसचे जोरदार प्रयत्न सुरु आहेत. शिवकुमार यांनी एम. टी. बी नागराज यांची भेट घेऊन त्यांची मनधरणी केली. एका बैठकीनंतर नागराज हे काँग्रेससोबतच राहणार असल्याची माहिती शिवकुमार यांनी दिली. दरम्यान, त्याचवेळी दुसरीकडे रामलिंग रेड्डी, मुणीरत्ना आणि आर. रोशन बेग यांची समजूत काढण्याचे प्रयत्न करण्यात येत आहे. तर भाजपनेही आता उघडपणे बंडखोरांची भेट घेण्याचे प्रयत्न केले आहेत.
भाजपाचे नेते उघडपणे दुखावलेल्या काँग्रेस आमदारांच्या भेटीला गेले आहेत. भाजप नेते येडीयुरप्पा यांच्या सांगण्यावरू भाजप आमदार विश्वनाथ यांनी भेट घेतली आहे. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि बंडखोर आमदार रामलिंगा रेड्डी यांची भेट घेतली आहे. तर काँग्रेसचे दुसरे बंडखोर आमदार एम.टी. बी नागराज यांच्याशी देखील भाजपच्या नेत्यांचा संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. दरम्यान, येडीयुराप्पा यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मदत करावे, अस बंडखोर आमदारांना आवाहन करण्यात आले आहे.
कसे वळवले नागराज यांचे मन?
कर्नाटकात नाट्यमय राजकीय घडामोड होताना दिसून येत आहे. डी. के. शिवकुमार आज पहाटे नागराज यांच्या घरी पोहोचले. त्यानंतर जवळपास पाच तास त्यांच्याशी चर्चा केल्याचे सांगण्यात येत आहे. शिवकुमार यांनी नागराज यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. या बैठकीनंतर नागराज काँग्रेससोबतच राहणार असल्याची माहिती शिवकुमार यांनी दिली. चाळीस वर्षे काँग्रेसमध्ये राहिल्यावर आता सोबतच राहायला हवे आणि सोबतच मरायला हवे, अशी माहिती शिवकुमार यांनी दिली.