कर्नाटकातल्या राजकीय अस्थिरतेचे लोकसभेतही पडसाद
कर्नाटकातल्या अस्थिरतेला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप
नवी दिल्ली : कर्नाटकातल्या राजकीय अस्थिरतेचे लोकसभेतही पडसाद उमटले. कर्नाटकातल्या अस्थिरतेला भाजपच जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला. तर राजीनामा द्यायची लागण राहुल गांधींनीच काँग्रेस पक्षाला लावल्याचा टोला संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी लगावला आहे.
कर्नाटकमध्ये आज काय राजकीय घडामोडी घडल्या.
1) सकाळी दहा वाजता उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांनी काँग्रेसच्या सर्व मंत्र्यांना नाश्त्यासाठी घरी बोलवलं.
2) त्यानंतर जी परमेश्वर यांनी सर्व मंत्र्यांशी बातचीत केली.
3) ही बैठक सुरू असतानाच अकरा वाजण्याच्या सुमारास माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे हे देखील बैठकीच्या ठिकाणी पोहोचले.
4) काँग्रेसच्या मंत्र्याची बैठक झाल्यानंतर के. सी वेणुगोपाल आणि सिद्धरामय्या यांनी सरकारला वाचवण्यासाठी उपमुख्यमंत्री जी परमेश्वर यांच्यासोबतच सर्व मत्र्यांनी राजीनामा दिला असल्याचं जाहीर केलं.
5) काँग्रेसच्या मंत्र्यानी राजीनामा दिल्यानंतर काहीच वेळात मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी ट्विट करून जेडीएसच्या सर्व आमदारांनी राजीनामा दिल्याचं जाहीर केलं.
काँग्रेसच्या कर्नाटकमधील सर्वच मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. काँग्रेसच्या २२ मंत्र्यांनी राजीनामे पक्षाच्या अध्यक्षांकडे दिले आहेत. पक्षाच्या हितासाठी राजीनामे दिल्याचं सांगितलं जातं आहे. काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी सर्व काँग्रेस नेते पोहोचले आहेत. मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी हे देखील उपमुख्यमंत्री जी. परमेश्वर यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. सध्या कर्नाटकात घडामोडी पाहायला मिळत आहे.