बंगळुरु: कर्नाटकमधील राजकारण दररोज नवनवी रंजक वळणे घेताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून याठिकाणी ऑपरेशन लोटसमुळे काँग्रेस आणि संयुक्त जनता दलाच्या (जेडीएस) अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अनेक केंद्रीय मंत्री जातीने प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. मात्र, आता या सगळ्यामागे एक वेगळेच कारण असल्याचे समोर आले आहे. 'द इंडियन एक्स्प्रेस'च्या वृत्तानुसार, काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांच्यातील अंतर्गत मतभेदांमुळे हा प्रकार घडला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिद्धरामय्या हे पूर्वी जेडीएस पक्षात असल्यामुळे त्यांचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्याशी अजूनही मतभेद आहेत. काँग्रेसशी युती करुन कुमारस्वामी यांनी सिद्धरामय्या यांच्यावर कुरघोडी केली होती. त्यामुळे नाराज असलेल्या सिद्धरामय्या यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना जेडीएससोबत असलेली युती तोडण्याचा सल्ला दिला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जेडीएस काँग्रेसपेक्षा वरचढ ठरू शकतो. त्यामुळेच सिद्धरामय्या यांनी काँग्रेसच्या काही आमदारांना लपवून ठेवले आहे. काँग्रेसच्या शुक्रवारी झालेल्या विधिमंडळ बैठकीला चार आमदार गैरहजर राहिले होते. यानंतर काँग्रेसने सर्व आमदारांना ईगल्टन रिसॉर्टमध्ये पाठवले होते. यामुळे घाबरलेल्या कुमारस्वामी यांनी लगेच भाजपच्या आमदारांशी संपर्क साधायला सुरुवात केली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून भाजपनेही आपल्या आमदारांना गुरुग्राम येथील सुरक्षित स्थळी हलवले आहे. 


आमदार फोडायला चौकीदाराकडे इतका पैसा कुठून आला; काँग्रेसचा मोदींवर हल्लाबोल


या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या बी.एस. येडियुरप्पा यांनी आम्ही सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करत नसल्याचे सांगितले होते. आम्ही विरोधी पक्षाची भूमिकाच बजावू. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसने घाबरण्याची गरज नाही, असे येडियुरप्पा यांनी सांगितले.