बंगळुरू: गेल्या काही दिवसांपासून अस्थिर असलेल्या कर्नाटकच्या राजकीय पटलावर शुक्रवारी नव्या घडामोडी पाहायला मिळाल्या. भाजपकडून करण्यात येणाऱ्या सत्तांतराचा दावा खोटा ठरवण्यासाठी आज काँग्रेसकडून विधिमंडळाची बैठक बोलावली होती. गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून वारंवार काँग्रेसचे आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे काँग्रेसच्या आजच्या बैठकीला सर्व आमदार उपस्थित राहणे गरजेचे होते. परंतु, ऐनवेळी काँग्रेसचे चार आमदार बैठकीला गैरहजर राहिल्याने मोठी खळबळ उडाली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामुळे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सिद्धरामय्या चांगलेच संतापले. त्यांनी यावरून भाजवर आगपाखड केली. कर्नाटकमधील सरकार पाडण्यासाठी नरेंद्र मोदी, अमित शहा आणि अनेक केंद्रीय मंत्री जातीने प्रयत्न करत आहेत. भाजपकडून आमच्या आमदारांना ५० ते ७० कोटींची ऑफर देण्यात आली आहे. आमच्याकडे त्याचे पुरावे आहेत. देशाच्या चौकीदाराकडे इतके पैसे कुठून आले, असा सवाल सिद्धरामय्या यांनी विचारला. दरम्यान, बैठकीला गैरहजर असणाऱ्या चार आमदारांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस पाठवण्यात येणार आहे. या सर्व आमदारांवर पक्षद्रोही विरोधी कायद्यातंर्गत कारवाई केली जाईल, असेही सिद्धरामय्या यांनी सांगितले. 


आज झालेल्या कर्नाटकमधील काँग्रेस आमदारांच्या बैठकीला मल्लिकार्जुन खर्गे,  सिद्धारामय्या, काँग्रेस महासचिव के. सी. वेणुगोपाल आणि राज्यातील इतर नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर काँग्रेसने आपल्या सर्व आमदारांना ईगल्टन रिसॉर्टमध्ये हलवले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर अवघ्या सात महिन्यांत राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांपैकी भाजपचे १०४, काँग्रेसचे ८० तर जेडीएसचे ३७ आमदार आहेत. तर उर्वरित तीन जागांवर बसपा, केपीजेपी आणि अपक्ष आमदार आहेत.