Devendra Fadnavis On Karnataka Result: कर्नाटकमधील निवडणुकीमध्ये (Karnataka Result) भारतीय जनता पार्टीला मोठा फटका बसला आहे. दर विधानसभा निवडणुकीला सत्ताधारी पक्ष बदलण्याचा ट्रेण्ड कर्नाटकमध्ये या निकालांमधूनही दिसून आला आहे. काँग्रेसला स्पष्ट बहूतम मिळालं असून काँग्रेसने 137 जागांसहीत 112 च्या बहुमताचा आकडा ओलांडला आहे. तर भाजपाची मात्र 106 जागांवरुन थेट 64 जागांपर्यंत घसरण झाली आहे. याच निकालानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मतांची टक्केवारी सांगत भाजपाला फारसे नुकसान झालेलं नाही, असं म्हटलं आहे. 


फडणवीसांनी आकडेवारी सांगितली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पत्रकारांशी चर्चा करताना फडणवीसांना, "काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं आहे.  भाजपाचं कुठं चुकलं? कुठे कमी पडले?" असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना, "कर्नाटकमध्ये आम्हाला अपेक्षित यश मिळालं नाही हे स्पष्ट आहे. जे निवडणून आले आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो," असं फडणवीस म्हणाले. तसेच पुढे बोलताना फडणवीसांनी निकालामधील मतांच्या टक्केवारीवरुन भाजपाला केवळ 0.4 टक्के मतांचा फटका बसल्याचं सांगितलं. "एकूण कर्नाटकचं विश्लेषण केलं तर तिथे 1985 पासून सातत्याने तेथील सरकार बदलत असतं. यावेळी ट्रेण्ड आम्ही तोडू असं वाटतं होतं पण आम्ही तो तोडू शकलो नाही. 2018 साली आमच्या 106 जागा आल्या होत्या तेव्हा आम्हाला 36 टक्के मतं होती. आता 35.6 टक्के मतं आहेत. म्हणजे अर्ध्या टक्क्याहूनही कमी प्रमाणात आमच्या मतांमध्ये घट झाली आहे. 0.4 टक्के मतं कमी झाली आहेत. 2018 ला मिळाली तेवढीच मतं आम्हाला मिळाली आहेत. मात्र आमच्या 40 जागा कमी झालेल्या आहेत. त्याचं प्रमाख्याने कारण काय आहे की 2018 मध्ये काँग्रेसला 38 टक्के मतं होतं. जनता दल सेक्युलरला म्हणजेच जेडीएसला जवळजवळ 18 टक्के मतं होती. जेडीएसची 5 टक्के मतं कमी झाली आहेत. ही मतं काँग्रेसकडे वळाली आहेत. याचाच काँग्रेसला फायदा झालेला आहे. भाजपाची मतं कुठेही कमी झालेली नाहीत," असं फडणवीस म्हणाले.



विरोधकांना सुनावलं


कर्नाटकमधील विजयानंतर विरोधकांकडून दिल्या जाणाऱ्या प्रतिक्रियांवरही फडणवीसांनी भाष्य केलं. "एक गोष्ट अजून लक्षात घेतली पाहिजे. त्यांना असं वाटतंय की जणू काही ते देशच जिंकले. त्यांना माझा एकच सल्ला आहे यापूर्वी वेगवेगळ्या विधानसभेचे लागलेले निकाल आणि लोकसेभेचे त्यानंतर लगेच झालेल्या निवडणुकीचे निकाल बघितले पाहिजे. तर त्यांना लक्षात येईल की त्यात काय अंतर असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उत्तर प्रदेशमधील स्थानिक निवडणुकांचेही निकाल आलेले आहेत. उत्तर प्रदेश देशातील सर्वात मोठं राज्य आहे. असं म्हणतात जे उत्तर प्रदेश जिंकतात ते देश जिंकतात. त्या उत्तर प्रदेशमध्ये आजच एकतर्फी पद्धतीने भाजपा निवडून आलेली आहे. भाजपा पूर्णपणे जिंकलेली आहे. त्यामुळे कर्नाटकचं उदाहरण देऊन लोक जणू काही देश जिंकल्याचं सांगत आहेत त्याला काहीही अर्थ नाही," असं फडणवीस म्हणाले.