कर्नाटक: राज्यपालांनी काँग्रेसला भेट नाकारली
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री जेडीएसचा तर, उपमुख्यमंत्री काँग्रेसचा तसेच, मंत्रीमंडळात २१ मंत्री जेडीएसचे तर, इतर मंत्री काँग्रेसचे असा हा प्रस्ताव आहे.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मदतानाची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. पण, हाती आलेले कल पाहता भाजप कर्नाटकातील सर्वात मोठा पक्ष ठरू शकतो. पण, असे असले तरी बहूमताच्या आकड्याने मात्र, भाजपला चकवा दिल्याचे चित्र आहे. अशा परिस्थीती दुसऱ्या क्रमांकावर असलेला काँग्रेस जेडीएसला पाठींबा देऊन सत्तेचा दावा करू पाहात आहे. त्यामुळे वेगवान हालचाली करत काँग्रेसने सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राज्यपालांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राज्यपालांनी काँग्रेसला भेटच नाकारल्यामुळे ही भेट पुढे ढकलली गेली आहे. पूर्ण निकाल हाती आल्यावरच भेट घेता येईल असे राज्यपालांनी म्हटल्याचे समजते.
जेडीएसने स्विकारला काँग्रेसचा प्रस्ताव
दरम्यान, कर्नाटकात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी जेडीएसने काँग्रेसचा पाठिंबा आणि प्रस्ताव स्विकारला आहे. विशेष म्हणजे जेडीएसला काँग्रेसने विनाअट पाठींबा दिला आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरण्याचे चिन्ह असूनही भाजपला सत्तासोपान काही गाठता येणार नसल्याचे प्राथमिक चित्र आहे.
काय आहे काँग्रेसचा प्रस्ताव
हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मुख्यमंत्री जेडीएसचा तर, उपमुख्यमंत्री काँग्रेसचा तसेच, मंत्रीमंडळात २१ मंत्री जेडीएसचे तर, इतर मंत्री काँग्रेसचे असा हा प्रस्ताव आहे. हा प्रस्ताव जेडीएसला मान्य असून, तो स्विकारल्याचे वृत्त आहे.