नवी दिल्ली : माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई कुप्पुसामी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दिल्ली येथील भाजप मुख्यालयात अण्णामलाई कुप्पुसामी यांनी पक्षाचे सरचिटणीस पी मुरलीधर राव आणि तामिळनाडूचे भाजप अध्यक्ष एल मुरगुन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.


कर्नाटकचे 'सिंघम' म्हणून ओळख


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी आयपीएस अन्नामलाई कुप्पुसामी हे कर्नाटकातील 'सिंघम' म्हणून लोकप्रिय आहेत. भाजपने ट्विट केले आहे की, "माजी आयपीएस अधिकारी अन्नामलाई कुप्पुसामी यांनी पी मुरलीधर राव आणि एल मुरगुन यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. अन्नामलाई कुप्पुसामी एक प्रामाणिक, शूर आणि सुप्रसिद्ध अधिकारी मानले जातात. त्यांच्या लोकप्रियतेमुळे जेव्हा त्यांची बदली उडुपी आणि चिक्कामगलुरू एसपी म्हणून झाली तेव्हाच स्थानिक लोकांनी त्याला विरोध केला होता.



2019 मध्ये राजीनामा 


अन्नामलाई कुप्पुसामी यांनी 2019 मध्ये पोलीस सेवेतून राजीनामा दिला होता. त्यांनी त्यावेळी राजकारणात येण्याबाबत काहीही सांगितले नसले तरी कर्नाटक सरकारचे गृहसचिव डी.रुपा म्हणाले की, त्यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.


राजीनामा देण्याबाबत अन्नामलाई यांनी कोणतीही घोषणा केली नव्हती किंवा कोणत्याही राजकीय पक्षात जाणार याबाबत जाहीर केले नव्हते.



पंतप्रधान मोदींचे कौतुक


अन्नामलाई अनेकदा भाजप आणि पंतप्रधान मोदींचे कौतुक करताना दिसतात. त्यांनी म्हटलं होतं की, भाजप हा एकमेव असा पक्ष आहे जेथे घराणेशाही नाही.


एकदा ते म्हणाले होते की, "तामिळनाडूमध्ये भाजपविषयी अनेक गैरसमज आहेत, याबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. मी मनापासून देशभक्त आहे. भाजपा हा एकमेव पक्ष आहे जिथे कोणतीही घराणेशाही नाही चालत. मला या पक्षासाठी सतत काम करण्याची इच्छा आहे."