काश्मीरमधील `हे` 109 वर्षे जुनं मंदिर आगीच्या भक्ष्यस्थानी; Photo पाहून सारे हळहळले
Kashmir Mohinishwar Shivalaya Shiv Mandir: काश्मीरमध्ये येणारे अनेक पर्यटक आणि भाविक या मंदिराला भेट दिल्यावाचून परतत नसत... कुठे आहे हे मंदिर? जिथं 23 वर्षे मुस्लिमांनी दिली निरंतर सेवा...
Kashmir Mohinishwar Shivalaya Shiv Mandir: जम्मू काश्मीर हे अनेक पर्यटकांच्या आवडीचं ठिकाण. निसर्गानं मुक्तहस्तानं केलेली उधळण इथं कानाकोपऱ्यात पाहता येते. अशा निसर्गाच्या अगाध लीला दाखवणाऱ्या काश्मीरमधील जवळपास 109 वर्षे जुन्या मंदिरालं आगीच्या भक्ष्यस्थानी येण्यानं मोठं नुकसान झालं आहे. 1915 मध्ये काश्मीरचे शेवटचे राजा महाराज हरी सिंह यांच्या पत्नी, महाराणी मोहिनी बाई सिसोदिया यांनी हे मंदिर उभारलं होतं.
मोहिनीश्वर शिवालय मंदिर, किंवा महाराणी मंदिर अशा नावांनी हे मंदिर ओळखलं जात होतं. गवताळ पठारांच्या मधोमध असणाऱ्या या मंदिराच्या चहूबाजूंनी बर्फाच्छादित पर्वतरांगाचं कोंदण पाहायला मिळतं. लाकूड आणि दगडी बांधकाम असणाऱ्या या मंदिरानं गुलमर्गच्या सौंदर्यात आणखी भर टाकली होती. पण, त्याचं हे सौंदर्य मात्र आता खंडित झालं आहे. पण पोलीस आणि स्थानिकांनी अथक प्रयत्न करूनही या मंदिराला लागलेली आग थांबवण्यात आली नाही, अशी माहिती घटनास्थळी दाखल झालेल्या अधिकाऱ्यांनी देत आगीचं कारण अद्याप अस्पष्ट असल्याचं सांगितल.
मंदिराचे पुरोहित पुरुषोत्तम शर्मा यांनी ही आग शॉट सर्किटमुळं लागली असावी अशी शक्यता व्यक्त करत जाळपोळीच्या अफवा उधळून लावल्या. वाऱ्याच्या वेगवान झोतामुळं शॉक सर्टिट झाला आणि आग वेगानं भडकत केली, त्यातच मंदिराचं बहुतांश बांधकाम लाकडी असल्या कारणानं आग अधिक वेगानं पसरल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. दरम्यान, सोशल मीडियावर या मंदिराचे जुने आणि आगीनं नुकसान झाल्यानंतरचे फोटो शेअर होताच अनेकांनी हळहळ व्यक्त केली.
स्थानिकांमध्ये चर्चा मंदिराच्या अनेक कहाण्यांची...
आगीमुळं मंदिराचं प्रचंड नुकसान झाल्यानंतर स्थनिकांमध्ये या मंदिराशी निगडीत अनेक कथा- कहाण्या चर्चेचा विषय ठरल्या आहेत. 1915 पासून आजच्या क्षणापर्यंत हे मंगिर गुलमर्ग आणि नजीकच्या भागातील अनेकांसाठी श्रद्धास्थानी होतं. भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित असणारं हे मंदिर इतक्या सुंदर ठिकाणी आहे की, पाहणारेही इथं येताच अवाक् होत असत. या मंदिराचं ठिकाण इतकं कमाल होतं, की गुलमर्गच्या कोणत्याही ठिकाणहून ते व्यवस्थित पाहणं सहज शक्य होतं. मोठ्या खिडकीचा वऱ्हांडा आणि मंदिराच्या आत उभं राहूनही दिसणारं नयनरम्य गुलमर्ग हे या ठिकाणाला आणखी खास ठरवून जात.
हेसुद्धा वाचा : EMI वाढला की घटला? RBI कडून नवे रेपो रेट जाहीर; पाहा बातमी तुमच्या खिशावर परिणाम करणारी
23 वर्षे मुस्लिमांनी केली निरंतर सेवा
या राज्यात जेव्हा तणावाच्या परिस्थितीदरम्यान काश्मिरी पंडितांनी इथून काढता पाय घेतला होता, त्यावेळी इथं या मंदिरात सेवा देण्याचं काम गुलाम मोहम्मद शेख नावाच्या एका मुस्लिम व्यक्तीनं घेतली. फार आधीपासून ते या मंदिराचे सुरक्षा रक्षक म्हणून काम पाहत होते. ते मुळचे बारामुला येथील दंडमुह ठिकाणचे रहिवासी. जोपर्यंत या मंदिराला पुरोहित नव्हते, तोपर्यंत जवळपास 23 वर्षे गुलाम मोहम्मद शेख यांनीच या मंदिरात निरंतर सेवा दिली. यासाठी त्यांनू पूजाविधी शिकून घेतला आणि मनोभावे शिवशंकराची आराधना केली. इथं आता याच गुलाम मोहम्मद शेख यांना स्थानिक 'पंडित जी' म्हणूनही ओळखतात.
हे मंदिर कलाजगतासाठीही तितकंच खास होतं. आजवर इथं अनेक चित्रपट आणि गीतांचं चित्रीकरण झालं होतं. ‘आप की कसम’ चित्रपटातील ‘जय जय शिव शंकर’ या गीताचं चित्रीकरण इथंच करण्यात आलं होतं. याशिवाय ‘अंदाज’ आणि ‘कश्मीर की कली’ चित्रपटातही हे मंदिर दाखवण्यात आलं होतं. असं हे ठिकाण इथून पुढं मात्र आधीसारखं दिसणार नाहीय... हीच शोकांतिका.