कश्मीरमध्ये कोरोनाचा पहिला बळी, एकूण मृतांचा आकडा १४
जगभरात कोरोनाची दहशत
मुंबई : जगभरात कोरोनाने थैमान मांडला आहे. असं असताना भारतातील अनेक राज्यात कोरोनाची लागण झाली आहे. अशातच काश्मीरमध्ये कोरोनाबाधित रूग्णाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. ६५ वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे बळी गेला असून हा काश्मीरमधील पहिला बळी आहे.
कोरोनाबाधित ही व्यक्ती ताब्लिजी जमातीतील असून २३ मार्च रोजी या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली होती. सोपार इथे मूळ घर असलेला हा रूग्ण श्रीनगरमध्ये राहत होता. अवघ्या तीन दिवसांत या रूग्णाचा बळी गेला आहे. महत्वाचं म्हणजे या व्यक्तीला मधुमेहाचा त्रास होता.
आतापर्यंत भारतात १४ नागरिकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत जगभरात २१ हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. फक्त इटलीतच ७५०० लोकांचा कोरानामुळे बळी गेला आहे. स्पेनने चीनचा बळींचा ३६०० चा आकडा पार केला आहे. भारतात आतापर्यंत ६०० लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. बुधवारी भारतात १००नवीन कोरोनाची लागण झालेल्या रूग्णांची नोंद झाली तर तिघांचा मृत्यू झाला. मुंबईत रुग्णांचा आकडा ४९ वर पोहचला.
गोव्यामध्ये कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत. असे असतानाही दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत ४२ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. मोदी सरकार १० कोटी लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचं समजत आहे. यासाठी दीड लाख कोटींचं पॅकेज घोषित करणार असल्याचं सांगण्यात येतंय. सरकारने तूर्त या निर्णयाची अंतिम घोषण केलेली नाही. पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे.