सरकारच्या कारभाराला कंटाळून IAS परीक्षेतील टॉपर अधिकाऱ्याने दिला राजीनामा
काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द करण्यासाठी कारस्थाने रचली जात आहेत.
श्रीनगर: जम्मू-काश्मीर खोऱ्यातील बदलत्या सकारात्मक परिस्थितीचा चेहरा म्हणून ओळखले जाणारे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) अधिकारी शाह फैसल यांनी बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. केंद्र सरकार काश्मीरच्या जनतेला विश्वासात घेण्याच्यादृष्टीने पुरेसे प्रयत्न करत नसल्याची खंत यावेळी त्यांनी बोलून दाखविली. तसेच काश्मीर खोऱ्यात निष्पाप नागरिकांच्या होणाऱ्या हत्येवरून त्यांनी सरकाराच निषेधही केला.
२००९ साली झालेल्या आयएएस परीक्षेत फैसल देशातून पहिले आले होते. अशी कामगिरी करणारे ते पहिले काश्मिरी ठरले होते. त्यामुळे ते उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहणाऱ्या सुशिक्षित काश्मिरी तरुणाईचा चेहरा झाले होते. सूत्रांच्या माहितीनुसार, नोकरीचा राजीमाना दिल्यानंतर फैसल राजकारणात प्रवेश करु शकतात.
केंद्र सरकार काश्मिरी जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी पुरेसे प्रयत्न करत नाही. काश्मीरला देण्यात आलेला विशेष दर्जा रद्द करण्यासाठी कारस्थाने रचली जात आहेत. तसेच भारतात जहाल राष्ट्रावादाच्या नावाखाली असहिष्णू वातावरण वाढीस लागल्याची टीका फैसल यांनी केली.