जम्मू-काश्मीरमध्ये राजकीय भूकंप, भाजपच्या सर्व मंत्र्यांचे राजीनामे
कठुआ सामूहिक बलात्कारानंतर जम्मू-काश्मीरचं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
जम्मू-काश्मीर : कठुआ सामूहिक बलात्कारानंतर जम्मूकाश्मीरचं राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या नऊ मंत्र्यांचे राजीनामे सक्तीने घेण्यात आलेत. कठुआ प्रकरणातील आरोपींना पाठिशी घालण्यासाठी भाजपच्या दोन मंत्र्यांनी मोर्चामध्ये सहभाग घेतला होता. त्यामुळे भाजपबाबत तीव्र भावना उमट होत्या. तसेच याप्रकरणी पीडीपी नेत्या आणि मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांनीही नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या दबावानंतर हे राजीनामे घेतल्याचे बोलले जात आहे. जम्मू-काश्मीरमधील सरकारमध्ये फेरबदलाची शक्यता वर्तविण्यात आलेय.
चिमुकलीवर सामूहिक बलात्कारानंतर संताप
कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणी जम्मू आणि काश्मीरमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. कठुआमधील ८ वर्षीय चिमुकलीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या करण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. हे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपींच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला होता. यामध्ये भाजपचे चंद्रप्रकाश गंगा आणि चौधरी लाल सिंह हे दोन मंत्री सहभागी झाले होते. या दोन्ही मंत्र्यांना तीव्र विरोधामुळे आधीच राजीनामे द्यावे लागले होते.
भाजपच्या ११ मंत्र्यांनी दिले राजीनामे
पीडीपसह राज्यात सत्तवेर असलेल्या भाजपच्या ९ मंत्र्यांनी आपल्या आपल्या पदाचे राजीनामे दिले आहेत. या सर्व मंत्र्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष सत शर्मा यांच्याकडे आपले राजीनामे सोपवलेत. आज या मंत्र्यांचे राजीनामे मुख्यमंत्री महबुबा मुफ्ती यांच्याकडे सोपवण्यात येतील. यानंतर महबूबा यांच्या मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची शक्यता आहे. मंत्र्यांच्या राजीनाम्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना देण्यात आली आहे. यापूर्वी भाजपच्या दोन मंत्र्यांनी राजीनामे दिले होते. त्यामुळे आता राजीनामे देणाऱ्या मंत्र्यांची संख्या ११ झाली आहे.