Video : केदारनाथमध्ये हिमस्खलन, सर्वांचाच थरकाप! 2013 मध्ये ज्या ग्लेशियरनं हजारोंना गिळलं तेच पुन्हा...
Kedarnath Avalanche : बऱ्याच दिवसांपासून सुरु असणाऱ्या (Chardham Yatra 2023) चारधाम यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरुंची संख्या आता दिवसागणिक वाढताना दिसत आहे. अशा या यात्रेदरम्यानच गुरुवारी थरकाप उडवणारी घटना घडली.
Kedarnath Avalanche : 'जय श्री बाबा केदार' असा जयघोष करत सध्या अनेक भाविक केदारनाथ धामच्या दिशेनं येताना दिसत आहेत. देशविदेशातील अनेकांनीच आतापर्यंत उत्तराखंडमधील या केदार धामला भेट दिली आहे. चारधामपैकी एक असणाऱ्या केदारनाथ इथं येताना हवामानाचा मारा सहन करत अनेक अडचणींवर मात करत ही मंडळी इथवर पोहोचत आहेत. पण, इथेही त्यांची परीक्षा संपलेली नाही. कारण, इथे निसर्गच त्यांची परीक्षा पाहतोय.
क्षणात पडणारा पाऊस, क्षणात निरभ्र आकाश आणि हवमान बदलून लगेचच होणारी बर्फवृष्टी हे सर्वकाही कमी वेळात होत असून, नागरिक या परिस्थितीशीसुद्धा दोन हात करत आहेत. पण, मागे हटेल तो निसर्ग कसला? याच निसर्गाच्या रुद्रावतारापुढे ही मंडळीही हतबल आहेत. गुरुवारी केदारनाथ मंदिर परिसर आणि डोंगररांगांमध्ये अशीच थरकाप उडवणारी घटना घडल्याचं पाहायला मिळालं.
केदारनाथमध्ये हिमस्खलन, व्हिडीओ व्हायरल...
पीटीआयकडून शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडिओमध्ये मंदिराच्या मुख्य द्वारापासूनच काही अंतरावर डोंगरांमध्ये हिमस्खलन झाल्याचं पाहायला मिळत असून, तिथं असणारे भाविकही काळीज रोखून या घटनेकडे पाहत असल्याचं कळलं. गुरुवारी साधारण सात ते आठ वाजण्याच्या सुमारास ग्लेशियर तुटण्याची घटना घडली. मंदिरापासून ही घटना अवघ्या 4 किमी अंतरावर घडली.
सूत्र आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ही घटना नेमकी तिथंच घडली जिथं 2013 मध्ये महाभयंकर आपत्ती आली होती. गुरुवारच्या घटनेमध्ये ग्लेशियर तुटून ते गांधी सरोवरात पडलं ज्यामुळं बर्फाचं प्रचंड वादळ आल्याचं पाहायला मिळालं. अनेक भाविकांनी मोबाईल कॅमेरामध्ये ही घटना कैद केली, पण तेव्हा त्यांच्याही डोळ्यांपुढं 2013 मधील विनाशाचं चित्र उभं राहिलं. अर्थात प्राथमिक माहितीनुसार हिमस्खलन मंदिरापासून दूर असल्यामुळं त्यानं कोणतंही नुकसान झालेलं नाही.
हेसुद्धा वाचा : साधेपणानं पार पडला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांच्या मुलीचा विवाहसोहळा; Video Viral
मोठं संकट टाळण्यासाठी प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय
सध्या चारधाम यात्रा आणि त्याहूनही केदारनाथ मंदिर परिसरात होणारी गर्दी पाहता प्रशासनानं मोठा निर्णय घेत यात्रोकरूंची ऑफलाईन नोंदणी 10 जूनपर्यंत आणि ऑनलाईन नोंदणी 15 जूनपर्यंते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. चारधाम यात्रेच्या निमित्तानं सध्या उत्तराखंडमध्ये येणाऱ्या भाविकांचा आकडा मोठ्या संख्येनं वाढताना दिसत आहे. त्यामुळं राज्य प्रशासनही या सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून असल्याचं कळत आहे.