Video Viral : किंकाळ्या, जीव मुठीत घेऊन पळणारे यात्रेकरू... केदारनाथ, बद्रीनाथ मार्गांवर पुन्हा निसर्ग कोपला
Kedarnath Badrinath Chardham Yatra 2023 : दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या चारधाम यात्रेची सुरुवात काही दिवसांपूर्वी झाली आणि त्यानंतर अनेक यात्रेकरूंनी उत्तराखंडची वाट धरली. पण, यात्रेची ही वाट वाटतेय तितकी सोपी नाही.
Kedarnath Badrinath Chardham Yatra 2023 : चारधाम यात्रा सुरु झाल्या क्षणापासून उत्तराखंडच्या दिशेनं येणाऱ्या अनेक पर्यटक आणि यात्रेकरूंचा ओघ वाढल्याचं पाहायला मिळालं आहे. पण, सध्या मात्र या यात्रेवर निसर्ग काहीसा रुसल्याचं पाहायला मिळत आहे. कारण एकिकडे पाऊस आणि बर्फवृष्टीमुळं चारधाम यात्रेची नोंदणी बंद ठेवण्यात आलेली असतानाच दुसरीकडे यात्रेसाठी एकएक टप्पो ओलांडणाऱ्या यात्रेकरूंनाही काही संकटांचा सामना करावा लागत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार बद्रीनाथ महामार्गावर असणाऱ्ये हेलंग पर्वतापाशी भूस्खलन झाल्यामुळं आता हा रस्ता बंद झाला आहे. वाहनांच्या रांगा उभ्या असतानाच तिथं एकाएकी एक आवाज झाला, शांततेला भेदणाऱ्या या आवाजापाठोपाठच डोंगराचा मोठा तुकडा, माती सारंकाही रस्त्यावर कोसळलं. ही दृश्य पाहून तिथं असणाऱ्या यात्रेकरूंनाही धडकी भरली आणि त्यांनी किंकाळ्या फोडण्यास सुरुवात केली. काहींनी तिथून जीव मुठीत घेऊन पळ काढला. सदर घटनेनंतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, भाविक मात्र मध्येच अडकून पडले असल्यामुळं प्रशानंनाही त्यांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
हेसुद्धा वाचा : Maharashtra Weather Forecast : वादळी पावसाचा मारा, त्यात घामाच्या धारा.... हवामान विभागाकडून चित्रविचित्र बदलांचा इशारा
सदर घटनेनंतर पोलिसांनी गौचर, कर्णप्रयाग आणि लंगासू या भागांमध्ये मार्ग बंद करत बद्रीनाथ दिशेनं जाणाऱ्या भाविकांना असाल त्या ठिकाणी थांबण्याचं आवाहन केलं. ज्यानंतर बद्रीनाथ यात्रा तूर्तास स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली.
केदारनाथच्या वाटेत ग्लेशियर तुटलं...
बद्रीनाथमधील चमोली येते आलेल्या संकटापूर्वी केदारनाथ येथेही अशाच पद्धतीचं संकट ओढावल्याचं पाहायला मिळालं. जिथं, खच्चरवरून सामान वाहून नेणारे चौघं संकटात सापडल्याची माहिती समोर आली. केदार घाटीमध्ये सुरु असणाऱ्या बर्फवृष्टीमुळं हे चौघंही एका ग्लेशियरमुळं अडचणीतआले. ज्यानंतर स्थानिकांनी तातडीनं बचाव पथकांशी संपर्क साधत त्यांच्यापर्यंत मदत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.
बचाव पथक घटनास्थळी पोहोचलं असता, तिथं ग्लेशियरखाली अडकलेल्या चंदा बहादुर, शेर बहादुर, खड़क बहादुर थापा आणि राम बहादुर यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. दरम्यान, सध्याच्या घडीला केदारनाथ आणि बद्रीनाथ मार्गावर हवामानामुळं बऱ्याच अडचणी निर्माण होत असून, त्यामुळं यात्रेकरुंना काही संकटांचा सामना करावा लागत आहे. इथं क्षणात रंग बदलणारा निसर्गही सध्या काहींना धडकी भरवताना दिसत आहे.
दरम्यान, सध्याच्या घडीला हवामान विभागानं दिलेल्या इशाऱ्यानुसार चारधाम यात्रा परिसर आणि मार्गावर काही भागांना पावसाचा तडाखा बसेल, तर काही भागांमध्या बर्फवृष्टीमुळं तापमानाट घट नोंदवण्यात येईल.