केदारनाथ धाम परिसरात व्हिडिओ, रिल्स बनवणाऱ्यांवर कारवाई होणार?
Kedarnath Temple News: उत्तराखंडमधील केदारनाथ धाम हे समस्त भारतीयांचे श्रद्धास्थान आहे. गेल्या काही दिवसांपासून केदारनाथ चर्चेत आले आहे.
देहरादूनः उत्तराखंड येथील केदारनाथ धाम (Kedarnath Dham) समस्त भारतीयांसाठी आस्थेचा विषय आहे. केदारनाथ येथे भगवान महादेवाची स्वयंभू पिंड आहे. भगवान महादेवाच्या दर्शनासाठी केदारनाथ येथे दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी येतात. एप्रिल महिन्यात केदारनाथचे मंदिर भक्तांसाठी खुले करण्यात आले होते. गेल्या दोन महिन्यात 11 लाखाहून अधिक जणांनी येथे दाखल झाले आहेत. गेल्या काही वर्षांपासून केदारनाथ येथे भाविकांची गर्दी वाढली आहे. यात रिल्स स्टार आणि युट्युबर्स यांचीही गर्दी वाढली आहे. मात्र, आता केदरनाथ धाम समितीने रिल्स स्टार आणि युट्यूबर्सविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे. स्थानिक पोलिसांकडे तसं मंदिर प्रशासनाने पत्र दिलं आहे.
गेल्या काहि दिवसांपासून युट्यूब आणि सोशल मीडियावर केदारनाथ धामचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अलीकडेच एका युट्यूबर तरुणीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यात ती केदारनाथ मंदिरासमोरच तिच्या प्रियकराला गुडघ्यावर बसून प्रपोज करत असल्याचे दिसत आहे. या व्हिडिओवरुन अनेकांनी तिच्यावर टीका केली होती. आता केदारनाथ समितीनेही पोलिसांकडे एक पत्र लिहित मोठी मागणी केली आहे.
चारधाम महापंचायतचे उपाध्यक्ष आणि वरिष्ठ तीर्थ पुरोहित यांनी ब्रदी-केदारनाथ समितीच्याकडून पोलिसांना एक पत्र लिहलं आहे. या पत्रात त्यांनी व्हायरल व्हिडिओचा आधार घेत एक मागणी केली आहे. केदारनाथ मंदिराच्या परिसरात रील्स बनवणाऱ्या लोकांवर करडी नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. तसंच, अशा व्हिडिओमुळं देश-विदेशातील हिंदू धर्मियांच्या भावनांना दुखावल्या आहेत. तसंच, अनेकांच्या प्रतिक्रियाही येत आहेत, असं या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
केदारनाथ धाम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात मंदिराच्या गाभाऱ्यात एक महिला महादेवाच्या पिंडीवर नोटा उधळत होती. त्यावेळी तिथे पुजारीदेखील उपस्थित होते. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी तीव्र शब्दांत या घटनेचा निषेध केला होता. तसंच, मंदिरातील पूजाऱ्यांनाही प्रश्न उपस्थित केले होते. महिला पैसे उडवत असताना पुजाऱ्यांनी तिला अडवले का नाही. तसंच, गाभाऱ्यात व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे तरी व्हिडिओ कसा काय काढण्यात आला, असा सवाल उपस्थित होत आहे.
केदारनाथ परिसरात बॉयफ्रेंडला केले प्रपोज
केदारनाथ परिसरातील आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओत दिसत असल्याप्रमाणे एका महिलेने गुडघ्यावर बसत तिच्या प्रियकराला प्रपोज केले आहे. त्यानंतर अंगठी घालून तिचे प्रेम व्यक्त केले आहे. इतकंच नव्हे तर यानंतर दोघांनी एकमेकांनी मिठीही मारली आहे. या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांनी तिच्यावर टीका केली आहे. तसंच. धार्मिक स्थळी असं कृत्य करणे योग्य नसल्याचंही काहींनी म्हटलं आहे.