पीएम मोदींना देशभक्ती गीत ऐकवणाऱ्या मुलाचे वडिल का भडकले कुणाल कामरावर?
बर्लिन दौऱ्यात एका लहान मुलाने पीए मोदी यांना देशभक्ती गीत ऐकवलं होतं, हा व्हिडिओ चांगलाच चर्चेत होता
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नुकतेच तीन दिवसांच्या युरोप दौऱ्यावर होते. पंतप्रधानांचा या वर्षातील हा पहिलाच विदेश दौरा होता. पीएम मोदी यांच बर्लिनला लोकांनी उत्साहात स्वागत केलं. लहान मुलांमध्येही प्रचंड उत्साह दिसत होता. एका मुलीने पंतप्रधानांना स्वतःच्या हाताने बनवलेलं चित्र दाखवलं, त्यावर मोदींनी मुलीचं कौतुक करत तिला ऑटोग्राफ दिला.
पीएम मोदींनी आणखी एका मुलाची भेट घेतली. आशुतोष पोळ असं या मुलाचं नाव असून त्याने पंतप्रधानांना 'हे जन्म भूमि भारत, हे मातृभूमि भारत' हे देशभक्ती गीत ऐकवलं. भारताबद्दलचं प्रेम 7 वर्षांच्या आशुतोषने आपल्या गाण्यात व्यक्त केलं होतं. पीएम मोदींनीही या मुलाचं तोंडभरून कौतुक केलं. इतकच नाही तर पीएम मोदींनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर लोकांच्या चांगलाच पसंतीस पडला.
व्हिडिओ केला एडिट
पण हा व्हिडिओ एडिट करण्यात आला असून स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने हा एडिटेड व्हिडिओ आपल्या ट्विटरवर शेअर केला. ज्यामध्ये या गाण्याचे बोल बदलण्यात आले. यावर मुलाच्या वडिलांनी कुणाल कामराला फटकारणारं ट्विट केलं आहे.
कुणाल कामरा यांनी पंतप्रधानांच्या मुलासोबतच्या संभाषणाचा व्हिडिओ शेअर केला. पण त्यात गाणं बदलण्यात आलं आहे. मुलाने हे जन्मभूमी भारत' हे गीत म्हटलं होतं. पण त्या गाण्याऐवजी पीपली लाइव्ह चित्रपटातील 'महंगाई डायन खाए जात हैं' हे गाणं एडिट करण्यात आलं.
मुलाच्या वडिलांनी फटकारलं
आशुतोषचे वडील गणेश पोळ यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. 'माझा मुलाग अवघ्या 7 वर्षांचा आहे, आपल्या प्रिय मातृभूमीसाठी गाण्याची इच्छा होती. तो अजूनही खूप लहान असला तरी त्याला आपल्या देशावर मिस्टर कामरा कि कचरा तुमच्यापेक्षा जास्त प्रेम आहे. माझ्या मुलाला तुमच्या घाणेरड्या राजकारणापासून दूर ठेवा आणि तुमच्या फालतू विनोदांवर काम करण्याचा प्रयत्न करा.
<
गणेश पोळ यांनी फटकारल्यानंतर कुणाल कामराच्या अकाऊंटवरून शेअर केलेला व्हिडिओ डिलीट करण्यात आला आहे.