नवी दिल्ली: भाजप सरकारने 'न्यू इंडिया' स्वत:जवळच ठेवावा आणि आम्हाला प्रेम आणि संस्कृती असलेला जुना भारत परत द्यावा, असे विधान काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी केले. ते सोमवारी राज्यसभेत बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, जुन्या भारतात शत्रुत्व, द्वेष, राग, झुंडशाही या गोष्टी नव्हत्या. मात्र, 'न्यू इंडिया'त माणूस माणसाचा शत्रू झाला आहे. त्यामुळे आम्हाला हिंदू, मुस्लीम, शीख आणि ख्रिश्चन समुदाय शांततेने नांदणारा आणि एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणारा, जुना भारत परत द्या, असे सांगत गुलाम नबी आझाद यांनी सरकारला टोला लगावला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुलाम नबी आझाद यांनी आपल्या भाषणात जमावाकडून होणाऱ्या मारहाणीचा (मॉब लिंचिंग) उल्लेख करताना म्हटले की, झारखंड हा मॉब लिचिंगचा आणि हिंसेचा कारखाना झाला आहे. याठिकाणी प्रत्येक आठवड्याला दलित आणि मुस्लिमांचा बळी जातोय. आम्ही 'सबका साथ, सबका विकास' या धोरणासाठी पंतप्रधानांसोबत आहोत. मात्र, हा विकास बघायला कोणी शिल्लक उरेल का?, असा जळजळीत सवाल गुलाम नबी आझाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विचारला. 



सध्या देशभरात झारखंडमधील मॉब लिचिंगचा मुद्दा गाजत आहे. यावरून बसपाचे राज्यसभेतील खासदार दानिश अली यांनीही सरकारला लक्ष्य केले. मोदी विरोधकांच्या महाआघाडीला 'महामिलावटी' म्हणतात. मग अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारलाही ते 'महामिलावटी' म्हणणार का, असा सवाल दानिश अली यांनी उपस्थित केला.