Crime News : केरळच्या (Kerla) कोल्लम (Kollam) जिल्ह्यातून एक हादरवणारी घटना समोर आली आहे. केरळच्या कोल्लमध्ये पतीने त्याच्या पत्नीला तिच्या कार्यालयाजवळ जिवंतपणी जाळले आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पतीने स्वतःचा गळा चिरून विहीरीत उडी मारून आत्महत्या केली आहे. या सगळ्या प्रकारानंतर केरळमध्ये खळबळ उडाली आहे. कोल्लममध्ये घडलेल्या या घटनेने स्थानिकांना जबर धक्का बसला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्लम जिल्ह्यातील नवाईकुलममधून ही अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी पतीने पत्नीच्या कार्यालयात घुसून तिला पेटवून दिले. नंतर स्वतःचा गळा चिरून विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. कोल्लममधील परिपल्ली येथे सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास ही खळबळजनक घटना घडली. पीडित महिला कोल्लम येथील परिपल्ली येथील अक्षय केंद्रात काम करत होती.


नादिरा (36) असे मृत महिलेचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे. तर रहिम (50) असे खून करून आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे. रहिम आणि नादिरा कोल्लममधील नवाईकुलम येथे त्यांच्या दोन मुलांसह भाड्याच्या घरात राहत होते. रहीम हा रिक्षा चालवायचा आणि नादिरा परिपल्लीच्या अक्षय सेंटरमध्ये काम करायची. या सगळ्या प्रकाराच्या तीन दिवस आधी रहीम तुरुंगातून बाहेर आला होता. रहिम वारंवार पत्नी नादिराला मारहाण करत होता. यामुळेच त्यावर अनेकदा गुन्हे दाखल होते, अशी माहिती शेजारच्यांनी दिली.


कोणत्या कारणामुळे केली हत्या?


अनेक दिवसांपासून रहिमला संशय होता की नादिराचे दुसऱ्या कोणाशी तरी विवाह बाह्यसंबंध आहेत. याच कारणामुळे तो अनेकदा नादिराला बेदम मारहाण करत होता, असे नादिरासोबत काम करणाऱ्या लोकांचे म्हणणे आहे. घटनेच्या दिवशी नादिरा तिच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर रहिमसुद्धा सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हेल्मेट घालून आतमध्ये पोहोचला. कार्यालयाच्या आतच रहिमने नादिराच्या अंगावर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले. घटनेची माहिती मिळताच कार्यालयामध्ये लोक जमा झाले. रहिमने तिथल्या कर्मचाऱ्यांना चाकू दाखवून बाहेर पळ काढला आणि जवळच्या विहिरीकडे गेला. त्यानंतर रहिमने स्वतःचाच गळा चिरून विहिरीत उडी घेतली.


दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तपास सुरु केला. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून रहिमचा मृतदेह विहीरीबाहेर काढला. त्यानंतर नादिरा आणि रहिमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.