Kerala Governor Arif Mohammed Khan: केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान (Arif Mohammad Khan) यांनी मल्याळी हिंदूंनी आयोजित केलेल्या हिंदू संम्मेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली. यावेळेस केलेल्या भाषणामध्ये त्यांनी मोदींवरील बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीवरुन (BBC Modi Documentary) टीकास्त्र सोडलं. खान यांनी भारतासाठी अंधकारमय भविष्यवाणी करणारे त्रस्त असल्याने ते नकारात्मक प्रचार करत आहेत, अशी टीका केली आहे. ज्या लोकांनी भारतासाठी येणारा काळ अंधकारमय असेल असं सांगितलं होतं, ज्यांनी भारताचे शेकडो तुकडे होतील असं सांगितलं होतं, ते हैराण आहेत असंही म्हटलं. याच कारणामुळे अशापद्धतीचा नाकारात्मक प्रचार करण्यासाठी ते अशा डॉक्युमेंट्रीचा आधार घेत आहेत. ज्यावेळी इंग्रज भारतात आले होते त्यावेळी त्यांनी डॉक्युमेंट्री का बनवली नव्हती? असा प्रश्न खान यांनी विचारला. 


"मला हिंदू म्हणा, हिंदू म्हणजे..."


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याचबरोबर केरळचे राज्यपाल असलेल्या खान यांनी या कार्यक्रमामध्ये उपलब्ध असलेल्या लोकांनी आपल्याला 'हिंदू' म्हणावं असंही म्हटलं. हिंदू हा धार्मिक शब्द नाही तर एका विशेष भौगोलिक क्षेत्रामध्ये जन्माला आलेल्या लोकांसाठी तो वापरला जातो, असा युक्तीवाद खान यांनी केला. "तुम्ही मला हिंदू का नाही म्हणत? मी हिंदू हा शब्द धार्मिक असल्याचं मानत नाही. 'हिंदू' एक भौगोलिक शब्द आहे. जो कोणी भारतामध्ये जन्माला आला आहे, अगदी कोणीही जो इथे (भारतात) राहतो किंवा भारतामध्ये अन्नग्रहण करतो, जो कोणी भारतामधील नद्यांचं पाणी पितो त्याला स्वत:ला हिंदू म्हणण्याचा अधिकार आहे," असं खान यांनी भाषणादरम्यान म्हटलं.


अनेक कंपन्यांचं नेतृत्व भारतीयांकडे


खान यांनी, "200 वर्षांपूर्वी भारत गरीब देश नव्हता. हे बाहेरचे लोक भारतामधील संपत्ती पाहून भारतात आले. 1947 पर्यंत आपण (आपला देश) दक्षिण आशियामधील गरिबीचं प्रतिक म्हणून पाहिला जाऊ लागला. आता सर्वकाही बदललं आहे. हे केवळ राजकारण किंवा जी-20 मध्ये नाही किंवा पंतप्रधान अथवा राष्ट्रपतींबद्दल घडलेलं नाही तर त्याहूनही मोठी एक महत्त्वाची गोष्ट आहे. आज अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांचं नेतृत्व भारतीय वंशाच्या लोकांकडे आहे. भारतीय आपली क्षमता ओळखू लागले आहेत," असंही म्हटलं. 


आपण कधीच शक्तीचा दुरुपयोग केला नाही


केरळच्या राज्यपालांनी असंही म्हटलं की आपल्याबद्दल एक गोष्ट फार सकारात्मक आहे की आपल्या इतिहासामुळे जगाला हे ठाऊक आहे की आपण शक्तीशाली असलो तरी इतरांसाठी धोकादायक नक्कीच नाही. आपण देश म्हणून कधीच स्वत:च्या ताकदीचा दुसऱ्यांवर हल्ला करण्यासाठी वापर केलेला नाही. उलट आमचा देश महिला आणि पुरुषांना समान वागणूक देण्यासाठी ओळखला जातो, असं खान म्हणाले. 


आपण त्यांना चुकीचं ठरवलं


खान यांनी पुढे असंही म्हटलं की भारताला स्वातंत्र्य मिळत होतं तेव्हा गुंडांच्या नेत्यांनी (ब्रिटीशांनी) भारत काही वर्ष सुद्धा हे स्वातंत्र्य टिकवू शकणार नाही असं म्हटलं होतं. या देशाचे तुकडे होतील आणि सर्वजण एकमेकांशी भांडतील. आपण आज त्यांना चुकीचं ठरवलं आहे, असं खान म्हणाले.


सुनक यांचा दिला संदर्भ


भारताने आपल्या स्वातंत्र्याबरोबरच लोकशाही आणि आपली आर्थिक परिस्थिती अधिक भक्कम केली आहे. आज भारत केवळ जी-20 ची अध्यक्षता करण्यासाठी पुढे आला आहे असं नाही तर ज्यांनी क्रूरपणे आपल्यावर अत्याचार केले त्यांचं नेतृ्त्व भारतीय वंशाची व्यक्ती (ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक) करत आहे. आज भारतीय वंशाची व्यक्ती ताकदीच्या जोरावर नाही तर मतांच्या जोरावर जगातील सर्वात शक्तीशाली देशाच्या पंतप्रधानपदी विराजमान झाला आहे, असंही खान म्हणाले.