मशिदीत महिलांना प्रवेश, हायकोर्टानं याचिका केली रद्द
शबरीमलामध्ये अयप्पा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर...
कोचीन : केरळ उच्च न्यायालयानं मुस्लीम महिलांना नमाज अदा करण्यासाठी मशिदीत प्रवेश देण्यासंबंधीची एक याचिका फेटाळून लावलीय. महत्त्वाचं म्हणजे, ही याचिका एका हिंदू समुहाकडून दाखल करण्यात आली होती. मुख्य न्यायाधीश ऋषिकेश रॉय आणि न्यायमूर्ती ए के जयशंकरन नाम्बियार यांच्या खंडपीठानं ही याचिका फेटाळून लावलीय. याचिकाकर्ते पीडित नाहीत किंवा यामुळे त्यांच्या अधिकारांना कोणत्याही प्रकारे बाधा पोहचत नाही, असं सांगत कोर्टानं ही याचिका रद्द केलीय.
ही याचिका अखिल भारतीय हिंदू महासभेच्या केरळ विभागाचे अध्यक्ष स्वामी दत्तात्रय साई स्वरुप नाथ यांनी दाखल केली होती. सर्वोच्च न्यायालयानं नुकत्याच दिलेल्या, शबरीमलामध्ये अयप्पा मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाचा उल्लेख करत याचिकाकर्त्यांनी ही याचिका दाखल केली होती.
या याचिकेत त्यांनी न्यायालयाकडे मुस्लीम महिलांना मशिदीत नमाज अदा करण्याची परवानगी देण्यासंबंधी निर्देश जारी करण्यासाठी केंद्र सरकारला आदेश देण्याची मागणी केली होती.
मुस्लीम महिलांना मशिदीच्या मुख्य हॉलमध्ये जिथे नमाज अदा केला जातो तिथे प्रवेश मिळण्याची परवानगी दिली जात नाही, त्यामुळे त्यांच्यासोबत भेदभाव होत आहे, असं त्यांनी आपल्या याचिकेत म्हटलं होतं. हा भेदभाव संविधानाच्या कलम १४ आणि २१ चं उल्लंघन असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.