तिरुअनंतपुरम : केरळमध्ये आपल्या अवघ्या पाच वर्षांच्या मुलीला स्कुटर चालवण्यासाठी देणं एका व्यक्तीला भलतंच महागात पडलंय. मोटार वाहन विभागानं सोमवारी या व्यक्तीचा परवाना निलंबित केलाय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एर्नाकुलम जिल्ह्यातील एडापल्लीच्या राज्यमहामार्गावर शिबू फ्रान्सीस या व्यक्तीनं आपल्या केवळ पाच वर्षांच्या मुलीच्या हाती चालत्या स्कूटरची कमान सोपवली होती. या स्कूटरवरून फ्रान्सीससोबत मागे त्याची पत्नी आणि पुढे दोन चिमुकल्या मुली प्रवास करत होत्या. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. 


बाजुनं गाडीतून जाणाऱ्या एका प्रवाशानं या घटनेचा व्हिडिओ काढत परिवहन आयुक्तांकडे यांची तक्रार नोंदवली. त्यानंतर एर्नाकुलमच्या  प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी तत्काळ या घटनेची दखल घेत कारवाईची पावलं उचलली. 


स्कूटर चालवणाऱ्या शिबूनं चौकशीत आपला गुन्हा कबूल केल्यानंतर त्याचा वाहन चालवण्याचा परवाना निलंबित करण्यात आला.