Kerala Nipah Update: सुरुवातील 2 रुग्ण इतकी असणारी निपाह विषाणूच्या संसर्ग बाधितांची संख्या आता केरळात 5 वर पोहोचली आहे. ज्यामुळं राज्यातील आरोग्य यंत्रणांची चिंता आता वाढली आहे. तिथं केंद्रीय आरोग्य यंत्रणासुद्धा केरळातील या संसर्गावर नजर ठेवून असल्याचं म्हटलं जात आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीना जॉर्ज यांनी दिलेल्या माहितीनुसार केरळात शासनातर्फे 'कंटेन्मेंट झोन'ही तयार करण्यात आले असून, जवळपास 700 नागरिकांची एक यादी तयार करण्यात आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या या नागरिकांपैकी 77 जणांवर विशेष लक्ष दिलं जात आहे. या 77 जणांना अतीधोकादायक वर्गात गणलं जात आहे. निपाह विषाणूच्या संसर्गामध्ये 70 टक्के रुग्णांचा मृत्यू होत असल्याची सरासरी आकडेवारी असल्यामुळं सध्या ही चिंता आणखी वाढताना दिसत आहे. राज्यात निपाहमुळं दोन रुग्णांचा मृत्यू ओढावला आहे. इतकंच नव्हे, तर संपूर्ण केरळात हा संसर्ग पसरण्याची भीती व्यक्त केली असून, आता केरळ लॉकडाऊनच्या दिशेनं जात असल्याचीच चिंता अनेक स्तरांतून व्यक्त केली जात आहे. 


9 वर्षांचा मुलगाही बाधित... 


कोझिकोडमध्ये 9 वर्षांच्या मुलाला निपाहची लागण झाली आहे. त्याच्या उपचारांसाठी आयसीएमआरकडू मोनोक्लोनल अँटीबॉडीचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या हा मुलगा व्हेंटिलेटरवर असल्याचं सांगण्यात येत आहे. यावेळी केरळमध्ये आलेल्या निपाहचा स्ट्रेन बांगलादेशचा असल्याचं सांगण्यात येत आहे. इथं संसर्गाचं प्रमाण तुलनेनं कमी असलं तरीही मृत्यूदर मात्र जास्त आहे. त्यामुळं केरळावरील हे संकट देशाचीही चिंता वाढवताना दिसत आहे. 


हेसुद्धा वाचा : संसदेच्या विशेष अधिवेशनात काय होणार? मोदी सरकारकडून खुलासा; मांडणार 'ही' 4 विधेयके


 


सार्वजनिक कार्यक्रम आणि समारंभांवर बंदी 


स्थानिक यंत्रणांनुसार निपाह बाधित आणि मृत व्यक्ती केरळातील ज्या ज्या भागांवरून पुढे गेले होते त्या रस्त्यांचा वापर न करण्याचं आवाहन नागरिकांना करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर केरळातील कोझिकोड जिल्ह्यातील सार्वजनिक कार्यक्रम आणि समारंभांवर बंदी आणण्यात आली आहे. जिल्ह्यातील 9 पंचायती आणि 58 प्रभागांना कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आलं असून, इथं केवळ अत्यावश्यक सुविधांनाच परवानगी देण्यात आली आहे. 


अत्यावश्यक सामग्रीची विक्री करणारी दुकानं सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी प्रशासनानं दिली असून, आरोग्य सुविधा पुरवणारी केंद्र, औषधविक्री करणारी दुकानं यांना मात्र वेळेचं बंधन घालण्यात आलेलं नाही. त्याशिवाय या भागातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर कोणतीही बस न थांबवण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे.