तिरुवअनंतपूरम : भगवान अय्यप्पांच्या आराधनेसाठी शनिवारपासून केरळमधील शबरीमला मंदिराचे Kerala Sabarimala द्वार खुले करण्यात येणार आहेत. पुढील दोन महिन्यांच्या मंडलाकला पर्वासाठी हे मंदिर शनिवारी सायंकाळी पाच वाजता खुले करण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला केरळ प्रशासनाकडून दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना कोणत्याही अडचणीचा सामना करावा लागणार नाही, यासाठी काळजी घेण्यात येत आहे. पण, या साऱ्यामध्ये दर्शनासाठी येणाऱ्या कोणत्याही महिला भाविकांना संरक्षण देण्यात येणार नसल्याचंही  स्पष्ट करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शबरीमला यात्रेदरम्यानच्या विविध टप्प्यांवर जवळपास दहा हजारहून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. डोंगराळ भाग आणि यात्रेच्या कोणत्याही टप्प्यावर चुकीचा कोणताही प्रकार घडू नये यासाठी ही काळजी घेण्यात येत आहे. 
मागील वर्षी सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश दिल्या जाण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिर परिसरात या निर्णयाविरोधात काही निदर्शनं झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्याच धर्तीवर यंदाच्या वर्षी कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठीची काळजी घेण्यात येत आहे. 


चुकीचे संदेश आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्यांवरही यावेळी करडी नजर ठेवण्यात येणार आहे. कोणत्याही प्रकारे अफवा पसरवणाऱ्यांना, समाजात तणावाची परिस्थिती निर्माण करणाऱ्यांना तातडीने ताब्यात घेण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.


महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि सर्वच वयोगटातील महिलांनासुद्धा काही महत्त्वाचे निर्देश देण्यात आले आहेत. राज्य शासनाकडून महिला भाविकांना कोणत्याच प्रकारचं संरक्षण देण्यात येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. परिणामी ज्यांना संरक्षण हवं आहे, त्यांनी सर्वोच्च न्यायालय़ाकडून तसे आदेश आणावेत असंही स्पष्ट करण्यात आल्याची माहिती Devaswom Minister कडकमपल्ली सुरेंद्रन यांनी दिली. मंदिराचा परिसर हा कोणत्याच्या प्रकारच्या निदर्शनांसाठी नाही. यापूर्वीसुद्धा शासनाकडून  सरकारकडून कोणत्याच महिलांना शबरीमला येथे नेण्यात आलं नव्हतं. यापुढेही नेण्यात येणार नाही असं त्यांनी स्पष्ट केलं. 



कोणत्याही प्रसिद्धीच्या कारणासाठी या मंदिराला भेट देऊ इच्छिणाऱ् महिलांना सरकारने प्रोत्साहन देऊ नये, असं म्हणत त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. दरम्यान, महिला हक्क कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी शुक्रवारीच आपण, २० नोव्हेंबरनंतर शबरीमला मंदिरात जाणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. केरळ राज्य शासलाकडून संरक्षण मिळो अथवा न मिळो त्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्यामुळे आता त्यांच्याकडेच अनेकांचं लक्ष लागलं आहे. 


पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाने महिलांच्या मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावरुन दाखल करण्याच आलेल्या याचिकेला सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवण्याच्या निर्णयानंतर शबरीमला मंदिराचे द्वार खोलण्यात येत आहेत. न्यायाधीशांचं हे खंडपीठ पुन्हा एकदा या धार्मिक बाबींवर लक्ष देणार असून, यापूर्वी सुनावण्यात आलेल्या सर्व वयोगटातील महिलांना मंदिरात प्रवेश देण्याच्या निर्णयाला आणि त्यांच्यावरील असणाऱ्या बंदीचे मुद्दे पुन्हा एकदा विचारात घेतले जाणार आहेत.