केरळकडून शिकावं तितकं कमीच; कोरोनातून सावरलेल्या रुग्णाला दिला असा निरोप
केरळमध्ये Coronavirus कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्याच अंशी यश मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे.
तिरुवअनंतपुरम : केरळमध्ये Coronavirus कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात बऱ्याच अंशी यश मिळत असल्याचं पाहायला मिळत आहे. देशामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण सापडलेल्या याच देवभूमी केरळमध्ये सध्या कोरोनातून सावरणाऱ्यांचा आकडाही लक्षणीय आहे. अतिशय धीराने या दक्षिणेकडील राज्याने संपूर्ण देशापुढे एक आदर्श प्रस्थापित केला. बरं, त्यांचं हे सत्र सुरुच आहे, असं म्हणायला हरकत नाही.
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक इटालियन नागरिक आणि त्याला निरोप देताना रुग्णालयातील काही मंडळी आणि केरळमधील काही मंत्री दिसत आहेत. ५७ वर्षीय रॉबर्टो थॉमॅसो असं या व्यक्तीचं नाव असून, त्याने अतिशय आनंदाने केरळचा निरोप घेतला. वर्काला येथे एका हॉटेलमध्ये असताना १३ मार्च रोजी या इटानियन प्रवाशाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. ज्यानंतर लगेचच त्याला सरकारी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
कोरोनाची लागण झालेल्या या पर्यटकाने बराच प्रवास केल्यामुळे त्याने प्रवास केलेल्या ठिकाणांचा इतिहास शोधणं हे प्रशासकीय यंत्रणांपुढे असणारं एक आवाहनच होतं. पण, तरीही त्याच्या संपर्कात आलेल्या जवळपास १२६ जणांची एक यादी तयार करण्यात आली. ज्यानंतर त्यांना क्वारंटाईनमध्ये राहण्याचा सल्लाही देण्यात आला.
कोरोनाची लागण झालेल्या या इटालियन पर्यटकावर तातडीने उपचार सुरु झाले. कोरोनाव्यतिरिक्त त्याला इतरही काही आजार असल्याची बाब समोर आली होती. सरतेशेवटी कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आल्यानंतर तो कोरोनामुक्त झाल्याचं जाहीर करण्यात आलं. ज्यानंतर सरकारकडून त्याला सावधगिरी म्हणून नेदुमानगड जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आलं. यादरम्यान राज्यातील बऱ्याच मंत्र्यांशी त्यानं संवाद साधला. अतिथी देवो भवं अशाच एकंदर अंदाजा प्रत्येकानं त्याला वागणूक दिली. इतकंच नव्हे तर त्याला खास भेटही देण्यात आली.
पर्यटकाने व्यक्त केला आनंद...
यापूर्वीही मी भारतभेटीला आलो होते. पण, यावेळी दुर्दैवानं नला कोरोनाची लागण झाली. मी ज्या रुग्णालयांमध्ये राहिलो तेथे डॉक्चर, परिचारिका आणि इतर सर्वच कर्मचाऱ्यांनी माझी चांगली काळजी घेतली. खाण्यापिण्यापासून उपचारापर्यंत सर्वच गोष्टी उत्तम होत्या, या शब्दांत त्याने केरळमधील या आव्हानात्मक दिवसांबद्दलही आनंदाची भावना व्यक्त केली. शिवाय येत्या काळात कोरोनाचं संकट टळल्यानंतर केरळमध्ये पुन्हा येण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली. केरळ या राज्याने आपल्या मनात घर केल्याची सुरेख भावना त्याने व्यक्त केली.
केरळमधून निघालेला हा पर्यटक बंगळुरूच्या दिशेने निघाला असून, तिथून पुढे तो इटलीला रवाना होणार आहे.