शशी थरुर रुग्णालयात दाखल; पूजेदरम्यान घडली दुर्घटना
मंदिरात आयोजित समारंभासाठी त्यांनी हजेरी लावली होती.
तिरुवअनंतपूरम : काँग्रेस नेते आणि तिरुवअनंतपूरम येथून लोकसभा निवडणुकीसाठी उभे असणाऱ्या शशी थरूर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 'तुलाभरम' म्हणजेच मंदिरात तुला करतेवेळी घडेल्या एका दुर्घटनेत ते जखमी झाले असून, त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. 'विशू' vishu 2019 अर्थात मल्याळम नववर्षाच्या निमित्ताने तिरुवअनंतपूरम येथील गांधारी अम्मन मंदिरात आयोजित समारंभासाठी त्यांनी हजेरी लावली होती.
थरुर यांची 'तुलाभरम' / तुला सुरू असतानाच एक दुर्घटना घडून थरुर पडले आणि त्यांना इजा झाली. 'द न्यूज मिनिट'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार थरुर यांच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाल्याचं कळत आहे. ज्यामुळे त्यांना लगेचच रुग्णालयातही नेण्याच आलं. त्यांच्या डोक्यावर सहा टाके घालण्यात आले असून, तिरुवअनंतपूरम मेडिकल कॉलेज येथे त्यांना नेण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सध्याच्या घडीला त्यांची प्रकृती उत्तम असून, कोणत्याही प्रकारचं संकट त्यांच्यावर घोंगावत नाही आहे.
तुलाभरम अर्थात तुला ही प्रथा अनेक हिंदू समुदायांमध्ये करण्यात येते. यामध्ये एखाद्या व्यक्तीला सोनं, धान्य, फळं किंवा त्याच्याच वजनाच्या इतर काही गोष्टींनी तोलण्यात येतं. तुला केल्यानंतर त्या गोष्टी या दान स्वरुपात वाटण्यात येतात.
थरुर यांनी दिल्या अशा प्रकारे दिल्या विशूच्या शुभेच्या
'विशू' अर्थात मल्याळम समुदायाच्या नवीन वर्षाचा आज पहिला दिवस. याच निमित्ताने थरुर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वांनाच या खास दिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. आई आणि बहिणींसोबतचा एक फोटो शेअर करत त्यांनी यावेळी बालपणीच्या आठवणींनाही उजाळा दिल्याचं पाहायला मिळालं.
निवडणुकीच्या प्रचारामध्ये व्यग्र
काँग्रेसच्या वतीने तिरुवअनंतपूरम येथून लोकसभेची उमेदवारी थरुर यांना देण्यात आली आहे. या मतदार संघात त्यांनी मोठ्या उत्साहात प्रचाराला सुरुवात केली असून, कधी ते मासेमारांसोबत संवाद साधताना दिसतात तर कधी एखाद्या स्थानिक नागरिकाच्या वाहनावरून मतदार संघात प्रचार करताना दिसतात. दोन वेळा या मतदार संघातून निवडून आलेले थरुर यंदा विजयाची हॅटट्रिक करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या मतदार संघात त्यांना राजशेखरन यांतं आव्हान असणार आहे. राजशेखरन यांनी नुकताच मिझोरमच्या राज्यपाल पदावरुन राजीनामा दिला होता.