नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे टेम्पल रन सुरुच आहे. केरळच्या वायनाडमधील मंदिरात त्यांनी दर्शन घेतले. राहुल यांनी पारंपरिक वेषात जाऊन मंदिरात पूजा केली. वायनाडमधील हे एक प्राचीन मंदिर आहे. राहुल गांधी यांनी वायनाडमधून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे राहुल यांच्या या पूजेला विशेष महत्त्व आहे. उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि केरळमधील वायनाड अशा दोन मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवणार आहेत.




COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


वायनाडमध्ये राहुल गांधी यांच्या मंदिर दर्शनानंतर काँग्रेस सरचिटणीस केसी वेणुगोपाळ यांनी गेल्या वेळी देखील राहुल गांधींनी येथे येण्याची ईच्छा व्यक्त केली होती. परंतु सुरक्षेच्या कारणास्तव ते इथे येऊ शकले नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. येथील पापनासिनी नदीमध्ये राजीव गांधी यांच्या अस्तींचे विसर्जन करण्यात आले होते. मंदिरातील पूजेनंतर राहुल गांधींनी सभेला संबोधित केले. मी पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा नाही आहे. मी त्यांच्यासारखे खोटे बोलत नाही. मला वायनाडच्या लोकांसोबत काही महिन्यांसाठी नाही तर  आयुष्यभरासाठी संबंध जोडण्याची ईच्छा असल्याचे त्यांनी म्हटले. 



पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात फूट पाडण्याचे पाप केले आहे असा आरोप राहुल गांधी यांनी वायनाडमधील सभेत केला. देशात बेरोजगारी मोदींमुळे वाढल्याचे राहुल गांधी म्हणाले. शेतकऱ्यांचे, कष्टकरांचे ३० हजार कोटी अनिल अंबानींच्या खिशात मोदींनी टाकले असा आरोपही राहुल गांधी यांनी केला आहे.