तिरुवनंतपुरम: गेल्या काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे केरळमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. राज्यातील १३ जिल्ह्यांना याचा फटका बसला असून प्रशासनाने सर्वत्र सावधानतेचा इशारा दिला आहे. पुरामुळे आतापर्यंत ९४ जणांचा मृत्यू झाला आहे. 
 
 या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी केरळच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडून पुराचा फटका बसलेल्या भागाची हवाई पाहणी केली जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी मोदींनी केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांच्याशी दूरध्वनीवरुन संपर्क साधून पूर परिस्थितीचा आढावा व सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते. 


तर दुसरीकडे हवामान खात्याने येत्या ४८ तासांमध्ये पावसाचा जोर ओसरण्याची शक्यता वर्तविली आहे. नौदलाच्या जवानांनी त्रिचुर, अलूवा आणि मवूत्तपुझा या परिसरात अडकलेल्या लोकांना हवाई मार्गाने सुखरुपरित्या बाहेर काढले. सध्याच्या घडीला राज्यातील तब्बल दीड लाख लोक विस्थापित झाले आहेत.