FIR दाखल झालेल्या Khan Sir चं खरं नाव काय? ते विद्यार्थ्यांमध्ये का आहे इतके प्रसिद्ध?
खान सरांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देशभरातून प्रचंड चाहते आहेत.
मुंबई : रेल्वेतील भरतीबाबत विद्यार्थ्यांचा गोंधळ सुरू झाला, जो आता थांबण्याचे नाव घेत नाही. इतकच काय तर बिहारमधील विद्यार्थ्यांनी रेल्वेच्या बोगीही पेटवून दिल्या आहेत. जे चुकीचे आहे. आता या प्रकरणात पाटण्यातील काही कोचिंग सेंटर चालकांचे नावही समोर येत आहे. ज्यांच्यामुळे या प्रकरणाला रौद्र रुप धारण झाले. 24 जानेवारी रोजी पटनाच्या राजेंद्र नगर टर्मिनलवर विद्यार्थ्यांनी गोंधळ घातला तेव्हा पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. त्यांच्या वक्तव्याच्या आधारे जीएस रिसर्च सेंटर कोचिंगचे संचालक आणि यूट्यूबर खान सर यांचे नावही समोर आले आहे. तसे पाहाता खान सर एक युट्युबर आहेत आणि त्यांना बरेच लोक ओळखतात. परंतु ते नक्की कोण आहेत? आणि विद्यार्थ्यांमध्ये ते इतके प्रसिद्ध का आहेत? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला त्यांच्या संदर्भात काही माहिती सांगणार आहोत
खान सरांचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर देशभरातून प्रचंड चाहते आहेत. खान सरांचे पूर्ण नाव फैजल खान आहे आणि ते मूळचे गोरखपूर, उत्तर प्रदेशचे आहेत. कोचिंग सेंटर चालवण्यासोबतच ते यूट्यूबवर मोफत क्लासेसही देतात. त्यांची शिकवण्याची शैली इतर शिक्षकांपेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. टिपिकल देशी शैलीत ते शिकवतात, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ते खूप प्रसिद्ध आहे.
वडील आणि भाऊ दोघेही सैनिक
फैजल खान उर्फ खान सर हे लहानपणापासूनच अभ्यासात चांगले होते. सामान्य ज्ञानावर त्यांची चांगली पकड होती. खान सरांचे वडील भारतीय लष्करात अधिकारी आहेत आणि त्यांचा मोठा भाऊही लष्करात कमांडो आहे, त्यामुळे त्यांनीही सैन्यात भरती होण्याचा निर्णय घेतला. 12वी उत्तीर्ण झाल्यावर नॅशनल डिफेन्स अकादमीची (NDA) परीक्षा दिली, पण निवड होऊ शकली नाही. यानंतर खान सरांनी कोचिंग द्यायला सुरुवात केली.
यानंतर, खान सरांनी यूट्यूबवर सामान्य अभ्यासाचे क्लासेस घ्यायला सुरुवात केली. ज्यानंतर ते यूपी आणि बिहार तसेच इतर राज्यांतील विद्यार्थ्यांमध्ये खूप प्रसिद्ध झाला. खान सरांनी सामान्य ज्ञान आणि विज्ञान इत्यादींवर पुस्तकेही लिहिली आहेत.
राजकारणाशी संबंध
खान सरांचा राजकारणाशीही संबंध राहिला आहे. बिहार पंचायत निवडणुकीत गणिताचे शिक्षक विपिन सर निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यानंतर खान सर त्यांच्यासाठी मते मागताना दिसले. विपिन सर त्यांच्या लोकप्रियतेमुळेच ती निवडणूक जिंकले. त्यानंतर असे बोलले जात आहे की, खान सरांचाही राजकीय हेतू आहे. त्यामुळे ते देखील काही दिवसांनी आपल्याला निवडूण लढवताना दिसु शकतील.