नवी दिल्ली: मोदी सरकारकडून लवकरच जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी किरण बेदी यांची नियुक्ती केली जाण्याची शक्यता आहे. किरण बेदी यांनी रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. यावेळी सलग दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्याबद्दल मोदींचे अभिनंदन करण्यासाठी, आपण ही सदिच्छा भेट दिल्याचे बेदी यांच्याकडून सांगण्यात आले होते. मात्र, आता या भेटीमागील खरे कारण समोर आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांच्या माहितीनुसार, सरकारकडून सत्यपाल मलिक यांच्याजागी जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदी किरण बेदी यांची नियुक्ती होऊ शकते. भाजप आणि पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांचे सरकार बरखास्त झाल्यानंतर काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. यानंतर काश्मीरमधील राजकीय आणि सामाजिक वातावरणात सातत्याने तणाव आहे. या पार्श्वभूमीवर मोदी सरकारकडून किरण बेदी यांची राज्यपालपदी नियुक्ती होण्याची शक्यता आहे. 


भाजपने पीडीपीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर मेहबुबा मुफ्ती यांचे सरकार कोसळले होते. यानंतर काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्सच्या पाठिंब्यावर पीडीपीने पुन्हा एकदा सत्तास्थापनेसाठी प्रयत्न केले होते. त्याचवेळी अवघे दोन आमदार असलेल्या सज्जाद लोन यांच्या पीपल्स कॉन्फरन्सनेही भाजप आणि इतर १८ आमदारांचा पाठिंबा असल्याचे सांगत सरकार स्थापनेचा दावा केला होता. मात्र, या सगळ्यामुळे घोडबाजाराला ऊत येतील, असे सांगत राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरची विधानसभा बरखास्त केली होती. 


किरण बेदी या सध्या पद्दुचेरीच्या नायब राज्यपाल आहेत. अनेक वादांमुळे त्यांचा हा कार्यकाळ गाजला आहे. काही दिवसांपूर्वी हेल्मेटसक्तीच्या निर्णयावरून किरण बेदी आणि पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांच्यात वाद रंगला होता. त्यावेळी मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी किरण बेदी यांच्या निवासस्थानाबाहेर धरणे आंदोलनही केले होते.