दरभंगा : आत्तापर्यंत काँग्रेसचे दिग्गज नेते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याच्या बातम्या आपण पाहिल्या. पण आता भाजप नेत्यानं काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे संकेत दिले आहेत. भाजपमधून निलंबित करण्यात आलेले नेते आणि माजी क्रिकेटपटू कीर्ती आझाद यांनी 2019 साली दरभंगामधून लोकसभा निवडणूक लढणार असल्याचं सांगितलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी एखाद्या राष्ट्रीय पक्षाचाच विचार करु, असंही आझाद म्हणाले. कीर्ती आझाद यांनी राहुल गांधींचं कौतुक केल्यामुळे ते काँग्रेसमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जातंय. 


राहुल गांधींचं कौतुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राहुल गांधी हे कुशल नेतृत्व असलेले नेते आहेत. राहुल गांधींच्या नेतृत्वात मला दम दिसतो, असं वक्तव्य आझाद यांनी केलं. तीन वर्षांपासून मी भाजपमधून निलंबित आहे. जर पक्षानं निलंबन कायम ठेवलं तर मला दुसरा पर्याय शोधावा लागेल, असा इशाराच आझाद यांनी दिला. काँग्रेसमध्ये जायच्या प्रश्नावरही आझाद यांनी उत्तर दिलं. भाजप आणि काँग्रेस हे राष्ट्रीय पक्ष आहेत आणि मला राष्ट्रीय पक्षाकडूनच निवडणूक लढायची आहे, असं आझाद म्हणाले.


2019मध्ये भाजप सरकार येणार नाही


2019 साली भाजप सरकार येणार नाही. भाजपची स्थिती खराब झाली आहे. भाजपनं जनतेसाठी कोणतीही कामं केलेली नाहीत, अशी टीका कीर्ती आझाद यांनी केली आहे. तसंच शत्रुघ्न सिन्हा यांचंही आझाद यांनी कौतुक केलं. शत्रुघ्न सिन्हा जे करतायत ते योग्य आहे. शत्रुघ्न सिन्हा पटणा साहिबमधून निवडणूक लढतील, असा विश्वास आझाद यांनी व्यक्त केला.