पीठ मळताना `या` टीप्स फॉलो करा, मग बघा तुमच्या चपात्या कशा फुलतील
पीठ नीट मळून जर तुम्ही घेतलंत तर, तुमची प्रत्येक रोटी फुलू लागते. त्यामुळे पीठ मळण्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.
मुंबई : फुलका किंवा चपाती प्रत्येक घरात बनवली जाते. मग दुपारचं जेवण असो किंवा रात्रीचं जेवण लोकांना चपाती खायला आवडते. परंतु अनेक घरात ही समस्या असते की, कितीही कणीक मऊ मळण्याचा प्रयत्न केला किंवा अनखी काही केलं तरी देखील नरम चपाती काही होत नाही. मग अशा वेळी लोकांचं मन चपातीवरुन हटतं. मग बऱ्याचदा लोकांना वाटतं की, मला चपातीच बनवता येत नाही. परंतु तसे नाही. चपाती नरम किंवा मऊ न होण्यामागचं कारण आहे तुमचं पीठ नीट मळलं गेलेलं नाही.
पीठ नीट मळून जर तुम्ही घेतलंत तर, तुमची प्रत्येक रोटी फुलू लागते. त्यामुळे पीठ मळण्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहेत, ज्या तुम्हाला पीठ मळताना खूप उपयोगी पडतील.
भांडं महत्वाचं
पिठ मळण्यासाठी परातीचा उपयोग करावा, जेणे करुन त्याच्या सपाट पृष्ठावर, तुम्हाला चांगलं पिठ मळता येईल. तसेच परातीमध्ये तुम्हाला पिठ मळायला जागा चांगली मिळते, याचा आपल्याला फायदा होतो.
पाणी जास्त राहू दे
पीठ अनेकदा कमी पाण्यामुशे घट्ट होते आणि जास्त पाणी घातल्यास ते चिकट आणि पातळ होते, त्यामुळे रोटी तव्याला चिकटते आणि फुगत नाही. अशा प्रकारची समस्या टाळण्यासाठी पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करा. कोमट पाण्याने मळलेल्या पिठाच्या रोट्या फुगतात. याचा एक फायदा असा आहे की यामुळे रोटी जास्त काळ मऊ राहते.
तेल मिसळले जाऊ शकते
जर तुमचे पीठ भांड्याला सतत चिकटत असेल, तर खूप कोरडे पीठ वापरण्याऐवजी त्याला तेल लावा. जास्त कोरडे पिठ मळल्यामुळे पीठ काही ठिकाणी कोरडे राहते, त्यामुळे चपाती चांगली बनत नाही.
मळण्याची वेळ
मऊ चपाती बनवण्यासाठी, पीठ किमान 10 मिनिटे आधी मळून घ्यावं आणि नंतर त्याच्या चपात्या कराव्यात यामुळे, रोट्यांचा रंग आणि चव देखील चांगली राहाते, तसेच आपल्याला रोटी लाटण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)