पंतप्रधांनांनी उल्लेख केलेली `नागरिकता` नावाची चिमुरडी आहे तरी कोण?
...आणि चिमुकलंचं नाव `नागरिकता` ठेवलं
नवी दिल्ली : नागरिकता सुधारणा कायद्याबाबत विरोधी पक्षांवर टीका करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ११ दिवसांच्या एका चिमुकलीचा उल्लेख केला होता. सध्या ही चिमुकली चर्चेचा विषय ठरत आहे. पण ही चिमुकली नक्की आहे तरी कोण? या चिमुकलीचा जन्म दिल्लीतील मजनूं का टीला या भागात झाला. नागरिकता सुधारणा कायद्यावरुन या चिमुकलीचं नाव 'नागरिकता' ठेवण्यात आलं आहे. हिंदू आश्रित कुटुंबात जन्मलेल्या या मुलीच्या आई-वडिलांनी, नागरिकता सुधारणा विधेयकाला संसदेत मंजुरी मिळाल्याच्या आनंदात मुलीचं नाव 'नागरिकता' ठेवलं आहे.
लोकसभेत नागरिकता सुधारणा विधेयक मंजुर झाल्यानंतर ११ डिसेंबर रोजी राज्यसभेतही विधेयकाला पूर्ण बहुमतासह मंजुरी देण्यात आली. नागरिकता सुधारणा विधेयक मंजुर झाल्याच्या आनंदात दिल्लीतील मजनूं का टीला भागात हिंदू आश्रितांनी आनंद व्यक्त केला. या भागातील एका पाक हिंदू आश्रित कुटुंबाने त्यांच्या मुलीचं नाव 'नागरिकता' ठेऊन सर्वांनाच आश्चर्यचकित केलं आहे. नागरिकता सुधारणा कायदा लागू होण्याच्या दोन दिवस आधी ९ डिसेंबर रोजी या मुलीचा जन्म झाला होता.
पाकिस्तानमध्ये अनेक वर्षांपासून राहणाऱ्या या हिंदू कुटुंबाला पाकिस्तानात देण्यात आलेल्या त्रासानंतर ते आश्रित म्हणून या भागात राहण्यास आले. मजनूं का टीला भागात २०१३ पासून १३५ हून अधिक कुटुंबात ८०० हून अधिक लोक राहतात. आश्रितांच्या रुपात जीवन जगणाऱ्या या लोकांकडे कोणत्याही नियमित रोजगाराची सोय नाही. मात्र या कायद्यानंतर त्यांनी आपला आनंद व्यक्त केला आहे.